बेळगाव लाईव्ह :सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतरच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊन नगरसेवक अभिजीत जवळकर यांना अटक करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी पुन्हा एकदा दिले आहे.
खानापूर रोडवरील दक्षता हॉस्पिटलकडून नगरसेवक जवळकर यांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात आपल्या कार्यालयामध्ये पोलीस आयुक्त बोलत होते. आमच्याकडे ज्यांनी तक्रार केली आहे ते मुळात दक्षता हॉस्पिटलचे चेअरमन नव्हे तर माजी चेअरमन व विद्यमान संचालक आहेत.
अटकेबद्दल सांगायचे झाल्यास 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता हॉस्पिटल मधील डिस्चार्ज घेण्यासाठी लागणारे सर्व सोपस्कार पूर्ण करून पोलिसांनी सायंकाळी अभिजीत जवळकर यांना अटक केली आहे. सोमवारी 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाई संदर्भात ते आज तक्रार घेऊन आले होते. मात्र आमच्याकडे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेल्या कागदपत्राची प्रत आहे. मी ती प्रत त्यांना दाखवताच ते निरुत्तर झाले. त्यांनी आणखी एक तक्रारवजा पत्र गुन्हा शाखेच्या एसीपींकडे दिले असून त्याची चौकशी सुरू आहे, असे आयुक्तांनी पुढे सांगितले.
डिस्चार्ज बाबतचा तपशील तपास अधिकाऱ्यांच्या हाती आल्यानंतर त्या संदर्भात पुढील कार्यवाही केली जाईल. पोलिसांनी जवळकर यांना जबरदस्तीने हॉस्पिटलमधून ताब्यात घेतले असते तर तशी तक्रार त्यावेळीच पोलीस ठाण्यात दाखल व्हावयास हवी होती. मात्र तशी तक्रार अजून दाखल झालेली नाही. आज सर्व घडून गेल्यानंतर तक्रार केली जात आहे. घडल्या घटनेमागे राजकारण आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. पोलीस तपासा संदर्भात मी बोलेन. राजकीय हस्तक्षेपाविना कायद्याच्या चौकटीत नि:पक्षपातीपणे चौकशी व तपास करून आमच्या तपास अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.
नगरसेवक जवळकर यांना 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता डिस्चार्ज मिळालेला आहे. मात्र हॉस्पिटलचे माजी चेअरमन आम्ही डिस्चार्ज दिला नव्हता अशी तक्रार करत असले तरी आमच्याकडे डिस्चार्जची कॉपी आहे. आम्ही कायद्याला धरून कारवाई केली आहे. कोणतीही जबरदस्ती वगैरे केलेली नाही, असे पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी शेवटी स्पष्ट केले.