बेळगाव लाईव्ह: महापालिकेत नगरसेवक विरुद्ध अधिकारी असा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. आरोग्य स्थायी समिती बैठकीला
उपस्थित न राहिल्याबद्दल आयुक्त अशोक दुडगंटी यांच्याविरोधात नगर प्रशासन संचनालयाकडे तक्रार करण्याचा ठराव संमत करण्यात आला. या प्रकारामुळे वादाला पुन्हा चालना मिळणार आहे.
घरपट्टी वाढ केली नसल्याचा ठपका ठेवून नगरप्रशासन संचालनालयाने महापौर शोभा सोमनाचे यांना नोटीस पाठवून महापालिका सभागृह का बरखास्त करू नये, असे विचारले होते. त्यानंतर महापालिकेत जोरदार राजकारण रंगले. चुकीचा ठराव पाठवल्यामुळे आयुक्त दुडगुंटी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यांची बढती रोखण्यात यावी, असा ठराव सत्ताधारी भाजपने सभागृहात केला. त्याविरोधात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. त्यांच्याविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार केल्यास महापालिका बरखास्त करू, असा इशारा दिला होता महापालिकेत पालकमंत्री जारकीहोळी आणि आमदार यांच्यात जोरदार वाद रंगला.
त्यानंतर महापौरांविरोधातही तक्रार देण्यात आली. त्यांच्या घरावर नोटीस लावण्यात आली. आमदार पाटील यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात काढण्यात आला. तर पालकमंत्री जारकीहोळी यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली. गेल्या काही दिवसांत हे प्रकरण शमते न शमते तोच आता पुन्हा अधिकाऱ्यांविरोधात ठराव करण्यात आला आहे.
आतापर्यंत झालेल्या आरोग्य स्थायी समिती बैठकींना आयुक्त दुडगुंटी एकदाही उपस्थित राहिलेले नाहीत. अनुपस्थितीबाबत ते कुणाला कळवतही नाहीत. त्यामुळे, त्यांच्याविरोधात नगर प्रशासन संचालनालयाकडे तक्रार करण्यात यावी. आयुक्तांवर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार करण्याचा ठराव करण्यात आला. अध्यक्ष रवि धोत्रे यांनी हा ठराव संमत केला केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
कायदा सल्लागारांचा सल्ला
आयुक्त दुडगंटी आरोग्य स्थायी समिती बैठकांना येत नसल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची तरतूद आहे का, असे अध्यक्ष धोत्रे यांनी कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी यांना विचारले. त्यावेळी त्यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करू शकता, असे सांगितले. त्यामुळे सरकार कोणतीही कारवाई करू देत, आम्ही आयुक्तांची तक्रार करणार, असे धोत्रे यांनी स्पष्ट केले.