बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराच्या स्वच्छतेच्या कामाचे कंत्राट देण्यासाठी महापालिकेने 28 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळताच निविदा काढली जाणार आहे.
बेळगाव महापालिकेकडून यावेळी शहरातील संपूर्ण म्हणजे 58 प्रभागांच्या स्वच्छतेच्या कामाचे कंत्राट दिले जाणार आहे. यासाठी 28 कोटी रुपयांची निविदा एकाच पॅकेजच्या माध्यमातून न काढता 6 पॅकेज केले जाणार आहेत.
प्रत्येक पॅकेज मधील निविदा रक्कम 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेकडून निविदा प्रस्ताव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. पुढील आठवड्यात हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.
शहर स्वच्छतेच्या कामासाठी नवा कंत्राटदार नियुक्त झाल्यास 138 कामगारांना तेथे सामावून घेता येणार असल्यामुळे नव्या कंत्राटदाराची नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाणार आहे.
यापूर्वी 2022 मध्ये महापालिकेने स्वच्छता कामाचे कंत्राट देण्यासाठी 47 प्रभागांसाठी निविदा काढली होती. त्याचप्रमाणे त्यावेळी 23 कोटी रुपयांचे पाच पॅकेज करण्यात आले होते. यावेळी सर्वच प्रभागांचे कंत्राट देण्यात येणार असल्याने निविदा रक्कम 5 कोटींनी वाढली आहे.
बेळगाव शहरातील 47 प्रभागांची स्वच्छता सध्या 9 कंत्राटदारांकडून केली जात आहे. नव्या 28 कोटींच्या निविदा प्रक्रियेत विद्यमान कंत्राटदारांपैकी एकच जण पात्र ठरणार आहे. उर्वरित कंत्राटदारांना निविदा दाखल करण्याची संधी मिळणार नाही, असे समजते.