बेळगाव लाईव्ह:बेळगाव महापालिकेतील दोघा नगरसेवकांवर त्यांचे पद रद्द होण्याची टांगती तलवार येण्याची चिन्हे आहेत. कारण श्री बसवेश्वर सर्कल (गोवावेस) येथील खाऊ कट्ट्या मधील दुकाने बेकायदेशीररित्या आपल्या पत्नीच्या नावावर करणाऱ्या नगरसेवक जयंत जाधव आणि मंगेश पवार यांच्यावर कारवाई करून त्यांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे केली आहे.
गोवावेस येथील वादग्रस्त खाऊ कट्ट्या संदर्भातील तक्रारींची गांभीर्याने दखल घेत सरकारने दिलेल्या आदेशावरून सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विशेष पथकाकडून चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याने निर्माण केलेल्या खाऊ कट्ट्यामधील दुकान गाळ्यांसंदर्भात प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्र. 23 चे नगरसेवक जयंत जाधव आणि प्रभाग क्र. 41 चे नगरसेवक मंगेश पवार या दोघांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत सरकारी खात्याने दीनदलित, गरीब गरजू लोकांसाठी तयार केलेल्या खाऊ कट्ट्यातील दुकान गाळे बळकावले आहेत. त्यांनी सदर गाळे आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर केले आहेत. खाऊ कट्ट्यामधील दुकान गाळा क्र. 29 सध्या श्रीमती सोनाली जयंत जाधव आणि गाळा क्र. 28 श्रीमती नीता मंगेश पवार यांच्या नावावर आहे.
सदरी प्रकार कर्नाटक नगरपालिका (केएमसी) कायदा 1976 च्या कलम 26(1)(के) चे स्पष्टपणे उल्लंघन करणारा आहे. तरी याप्रकरणी सखोल नि:पक्षपाती चौकशी करून नगरसेवक जयंत जाधव व मंगेश पवार यांच्यावर कारवाई करावी. महानगरपालिकेतील त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशा आशयाचा तपशील सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत नमूद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुळगुंद यांच्या तक्रारीची दखल घेत प्रादेशिक आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सुजित मुळगुंद यांनी ठोस कागदोपत्री पुराव्यानिशी नगरसेवक जाधव आणि पवार यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली चौकशी लक्षात घेता संबंधित दोन्ही नगरसेवकांवर त्यांचे पद रद्द होण्याची टांगती तलवार आली असली तरी त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होणार? हे पहावे लागेल.
दरम्यान, बेळगाव लाईव्हशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी खाऊ कट्टा येथील दुकान गाळे नगरसेवक जयंत जाधव आणि मंगेश पवार यांनी बेकायदेशीर रित्या बळकावून आपल्या पत्नीच्या नावे केले आहेत अशी तक्रार मी प्रादेशिक आयुक्तांकडे केली आहे. किमान नगरसेवक झाल्यानंतर तरी त्यांनी त्या जागेवरील हक्क सोडून द्यायला पाहिजे होता. मात्र तसे न करता ते त्यातून फायदा कमवत आहेत. या पद्धतीने गरीब गरजू लाभार्थींच्या हक्कावर त्यांनी गदा आणली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी, त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणी मी प्रादेशिक आयुक्तांकडे केली आहे. त्यानुसार प्रादेशिक आयुक्तांनी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. मी ठोस कागदोपत्री पुराव्यासह तक्रार केली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चौकशीमध्ये त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल, असा विश्वास मुळगुंद यांनी व्यक्त केला आहे.