बेळगाव लाईव्ह : घरकुल योजनेसाठी जमीन संपादनास विरोध करणारे शेतकरी ज्यावेळी बैठकीसाठी येतात त्यावेळी चक्क बुडा आयुक्तांनी पळ काढल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.कणबर्गी निवासी घरकुल योजना क्रमांक 61 साठी काहीही झाल्यास आम्ही जमीन देणार नाही असा निर्धार करून आलेल्या शेतकऱ्यांना बैठकीसाठी तासनतास ताटकळत ठेवून आयुक्तांनी परस्पर घर गाठले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
कणबर्गी निवासी योजनेसाठी निधी मंजूर झाला असून नव्याने 160 एकर जमिनीवर ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून मंगळवारी त्या खुल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला विरोध दर्शवत योजनेसाठी आम्ही जमीन देणार नाही हे सांगण्यासाठी बुडा आयुक्तांना भेटण्यास गेले होते.
त्यावेळी आयुक्तांनी शेतकऱ्यांना मीटिंग हॉलमध्ये बसण्यास सांगितले. पण दीड तास झाला तरी आयुक्त बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी चौकशी केली असता आपल्याला दुसरी बैठक होती त्यामुळे परस्पर निघून आलो असे आयुक्तांनी सांगितले.
शेतकऱ्यांची बाजूला ऐकताच आयुक्तांनी पळ काढल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्याने वकिलांशी चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत या योजनेसाठी जमीन देणार नाही, असा निर्णय घेतला.
एकूणच शासनाने जमीन संपादनाचा सपाटा लावला असून शेतकऱ्यांची जमीन बेळगावात मोठ्या प्रमाणात संपादित केली जात आहे याला शेतकरी विरोध करत आहेत मात्र प्रशासन शेतकऱ्यांचे म्हणणे देखील ऐकण्यास इच्छुक नाही हे सोमवारी घडलेल्या घटनेवरून समोर येत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या कणबर्गी निवासी योजनेसाठी निविदा काढण्यात आले आहेत. या निविदा उद्या खुल्या होणार असून त्यामध्ये ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. येत्या दोन महिन्यात योजनेसाठी प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती बुडाकडून देण्यात आली आहे.