बेळगाव लाईव्ह:आवश्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरतीसह फर्निचर आणि इतर वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी बेळगावातील 250 खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला अनुदानासाठी सूचित केले जाईल असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण , कौशल्य विकास, उद्योजकता आणि उपजीविका खात्याचे मंत्री शरणप्रकाश आर. पाटील यांनी दिले.
शहरातील जिल्हा रुग्णालय अर्थात बीम्स हॉस्पिटलच्या सुपर स्पेशालिटी हॉलमध्ये आज शनिवारी सकाळी आयोजित हॉस्पिटलच्या विकास आढावा बैठकीत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. बेळगावचे जिल्हा रुग्णालय सुमारे 150 वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. त्या पद्धतीने रुग्णालयाची इमारत जुनी झाल्यामुळे आजपर्यंत अनेक वेळा तिच्या दुरुस्तीचे काम झाले आहे.
जिल्ह्याच्या सर्व भागातून मोठ्या संख्येने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अपुऱ्या खाटा अर्थात बेड्समुळे गैरसोयीचा सामना करावा लागतो. यासाठी शहरात योग्य जागा पाहून त्या ठिकाणी 450 बेड्सचे नवे रुग्णालय उभारण्यात यावे अशी सूचना विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी आजच्या बैठकीत केली. या सूचनेची दखल घेत मंत्री शरणप्रकाश पाटील यांनी जनतेच्या हितासाठी 450 बेड्सचे नवे रुग्णालय उभारण्यासाठी आराखडा व प्रस्ताव तयार करून सरकारकडे पाठवण्यास सांगितले. तसेच या रुग्णालयासाठी जागा निश्चिती आणि ते उभारण्यासाठी येणारा खर्च या संदर्भात सरकार पातळीवर तात्काळ चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या बऱ्याच काळापासून चिक्कोडी येथे माता -शिशु रुग्णालय उभारण्याची मागणी होत आहे. मात्र या मागणीची दखल संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली जात नसल्यामुळे स्थानिक रुग्णांना उपचारासाठी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली अशा ठिकाणी जावे लागत आहे. सौंदत्ती, निप्पाणी, चिक्कोडी येथे माता शिशु रुग्णालय बांधण्यास गेल्या 2017 साली मंजुरी मिळाली असून निधी देखील वितरित करण्यात आला आहे. तथापि चिक्कोडीमध्ये आजतागायत माता शिशु रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांना जाब विचारल्यास त्यांच्याकडून अनावश्यक उडवा उडवीची उत्तरे दिली जातात, अशी तक्रारही विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी केली. त्याचप्रमाणे चिक्कोडी येथील संबंधित रुग्णालयाच्या उभारणीसाठी तात्काळ नव्याने निविदा काढण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
बिम्स हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या हजेरी संदर्भात बोलताना मंत्री शरणप्रकाश पाटील यांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिकची सतत पाहणी करून हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचा पगार दिला जावा असे स्पष्ट केले. बैठकीस बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ, बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी, प्राचार्य व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अण्णासाहेब बी. पाटील, बीम्सचे सीईओ सिद्धू हुल्लोळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे, बीम्स आरएमओ डाॅ. सरोजा तिगडी, नामदेव माळगी, प्रकाश कोडली आणि इतर अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर मंत्री शरणप्रकाश पाटील यांनी बीम्स हॉस्पिटलचा दौरा करून कामकाजाची पाहणी केली.