बेळगाव लाईव्ह :बेळगाव आणि परिसरात श्रीशैलमचे प्रवासी मोठ्या संख्येने आहेत. अनेक भाविक पायी वारी करून या देवाच्या दर्शनाला जातात. त्यांच्या सोयीसाठी नैऋत्य रेल्वेने एक महत्वाची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. हुबळी येथे जाऊन अनेकजण रेल्वे सुविधेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत असून हुबळी- विजयवाडा एक्सप्रेस बेळगावहून चालविल्यास अनेक भाविकांची सोय होणार आहे.
हुबळी – विजयवाडा क्रमांक 17329 व 17330 या रेल्वे ची उपलब्धता बेळगाव रेल्वे स्थानकापासून झाल्यास भाविकांना अधिक सोयीचे ठरणार आहे. अशी माहिती रेल्वे अभ्यासक अरुण कुलकर्णी यांनी बेळगाव लाईव्ह ला दिली आहे. हुबळी येथून सुरु असलेली ही सोय बेळगावातील प्रवाशांनाही मिळाल्यास श्रीशैलम चा प्रवास सहज सोपा आणि सुखाचा ठरणार आहे.
श्रीशैलम ला जाणाऱ्या प्रवाशांनी मरकापूर रोड रेल्वे स्टेशनला उतरल्यास तिथून ६० किमीचा प्रवास करून देवदर्शन करता येते. दरम्यान अनेक प्रवासी हुबळी येथे जाऊन मरकापूर रोड रेल्वे स्टेशन पर्यंतचे तिकीट घेतात आणि पुढे पायी किंवा रस्ते वाहतुकीच्या माध्यमांचा वापर करून प्रवास करतात. दरम्यान ही सोय बेळगाव येथून मिळाल्यास बेळगाव जिल्ह्यातील भाविकांना सोयीचे ठरणार आहे. जिल्ह्यातून प्रामुख्याने गोकाक, बैलहोंगल आणि बेळगाव तालुक्यातील भाविकांची संख्या मोठी आहे.
सध्या ही रेल्वे सायंकाळी ७. ३० वाजता हुबळी येथून निघते. तीच जर बेळगाव मधून सायंकाळी ६ वाजता निघाल्यास सोयीचे ठरणार आहे. नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बेळगाव येथील लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात योग्य पाठपुरावा केल्यास ही मागणी मान्य होण्यास आशा आहे.