बेळगाव लाईव्ह : पत्रकार विरोधी वक्तव्य केल्याने बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात बेळगावातील पत्रकारांनी ठराव केला असून याची तक्रार प्रदेश काँग्रेस आणि ए आय सी सी कडे करणार आहेत.
महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळर यांनी बेळगावचे पत्रकार नालायक असल्याचं अत्यंत निंदनीय आणि अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. त्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी कन्नड साहित्य भवन येथे पत्रकारांची निषेध सभा घेण्यात आली.
11 नोव्हेंबर रोजी कन्नड भवन येथे पत्रकारांच्या सत्कार कार्यक्रमात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगावच्या पत्रकारांबद्दल दिलखुलासपणे अपमानास्पद भाष्य केले. त्यामुळे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करणाऱ्या या बैठकीत ४२ हून अधिक ज्येष्ठ पत्रकार सहभागी झाले होते.
मंत्री हेब्बाळकर यांनी पत्रकारांशी केलेल्या वक्तव्याबद्दल ज्येष्ठ पत्रकारांनी संताप व नाराजी व्यक्त केली. तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान असल्याचं मत व्यक्त करत या बैठकीत मंत्री हेब्बाळकर यांच्या विरोधात निषेधाचे पाच महत्त्वाचे ठराव घेण्यात आले.
बैठकीत मंत्री हेब्बाळकर यांच्या निषेधाचे पाच महत्त्वाचे ठराव घेण्यात आले. निषेधाचा ठराव असे आहेत
१) मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बेळगावच्या पत्रकारांविरोधातील वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
२) मंत्री महोदयांनी आपले विधान तात्काळ मागे घ्यावे आणि बिनशर्त माफी मागावी अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली.
3) एआयसीसी, केपीसीसी अध्यक्षांनी मंत्र्यांच्या वक्तव्याविरोधात जिल्हा प्रभारी मंत्री कार्यालयात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
4) बैठकीत हे ठराव कर्नाटक श्रमजीवी पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
5) आजच्या धिक्कार सभेचा ठराव अहवाल वृत्तपत्र आणि विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना अपमानास्पद बोलणे आता लक्ष्मी हेब्बाळकर यांना चांगलेच महागात पडू शकते.सन्माननीय पत्रकारांच्या बाबतीत जर ह्या मंत्री महोदय एवढे मुजोरपणाने बोलत असतील तर सर्वसामान्य नागरिकांशी त्या कशा पद्धतीने वागत असतील? असा सवालही इथे उपस्थित होतो त्यामुळे एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातूनही याचा फटका लक्ष्मी हेब्बाळकर यांना बसू शकतो असे बोलले जात आहे.