Friday, December 27, 2024

/

बेळगावकरांची बेसिक गरज रेल्वे खाते पूर्ण करणार का?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बस विमान आणि कारसारखी खासगी वाहने आली तरी आजही मोठा वर्ग रेल्वे प्रवासावर अवलंबून आहे. रेल्वे प्रवास हौस म्हणून करणारे आहेत तसेच गरज म्हणून या प्रवासावर भर देणारे अधिक आहेत. या नियमित रेल्वे प्रवाशांच्या काही पायाभूत गरजा आहेत. आणि या लवकरात लवकर पूर्ण होण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासन आणि बेळगावचे लोकसभा आणि राज्यसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींनी याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

शिक्षण, रोजगार, व्यापार आणि पर्यटन आदी कारणांसाठी रेल्वे प्रवासावर भर देणाऱ्या प्रवाशांना या पायाभूत सुविधा हव्या आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणारे एक शहर म्हणून बेळगाव ओळखले जाते. लोंढा आणि मिरज जंक्शन च्या दरम्यान येणारे बेळगावचे रेल्वेस्थानक योग्य रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास प्रवाशांची तर सोय करू शकतेच शिवाय रेल्वे प्रशासनाच्या महसुलात प्रचंड मोठी वाढ घडवू शकते. बेळगाव येथील रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य आणि रेल्वेचे अभ्यासक अरुण कुलकर्णी यांच्याशी बेळगाव live ने बातचीत केली. आणि आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबद्दल त्यांनी विशेष माहिती दिली आहे.

वास्कोसाठी हवी इंटरसिटी रेल्वे
बेळगाव आणि गोवा म्हणजे १०० किमीच्या अंतरावरील पक्के शेजारी. गोव्यातील व्यवसाय बेळगावकरांवर अवलंबून आहेत तर बेळगावातील भाजी पासून कपडे आणि किराणा मालाचे व्यापारी गोमंतकीयांवर अवलंबून आहेत. यापैकी अनेकजण बस आणि इतर खासगी वाहनांवर अवलंबून असले तरी रेल्वे सुविधांची मागणी करणाऱ्या प्रवाशांची संख्याही काही कमी नाही. याच प्रवाशांच्या दृष्टीने बेळगाव किंवा मिरज वरून गोव्यातील प्रमुख शहर वास्को साठी इंटरसिटी रेल्वेची गरज सध्या प्रामुख्याने उभी राहिली आहे.

व्यापारी, ग्राहक, पर्यटक आदी सर्वांसाठीच ही सेवा महत्वाची ठरणार आहे. मिरज मधून शक्य नसल्यास ही सेवा वास्को ते बेळगाव या टप्प्यावर सुरु करणे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे संबंधितांनी या सेवेच्या पूर्ततेकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

हुबळी- पुणे वन नाईट जर्नीची सोय
महाराष्ट्रातील पुणे आणि उत्तर कर्नाटकातील हुबळी या दोन प्रमुख शहरांना बेळगाव मार्गे जोडणारी वन नाईट जर्नी एक्सप्रेस सुविधा आवश्यक असल्याची मागणी वारंवार होत असताना या मागणीकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. या मार्गावरील प्रमुख ठिकांवरून पुणे आणि हुबळी कडे प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एका रात्रीत एक्सप्रेसच्या माध्यमातून हुबळीतुन पुणे आणि दुसऱ्या बाजूने पुण्यातून हुबळीला जाण्याची सोय अनेकांसाठी फायद्याची ठरणार आहे.

रात्रीचा प्रवास करून दिवसभर आपली कामे आटोपून परत येणे शक्य झाल्यास धोकादायक रस्ते प्रवास टाळून अनेक प्रवासी ही सेवा वापरू शकतात. याचा विचार संबंधितांनी करण्याची गरज आहे.Indian railway

आठवड्यातून तीनवेळा तिरुपती
बेळगावातून धार्मिक पर्यटन करणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. तिरुपतीला जाण्यासाठी रेल्वे प्रवासी प्रचंड संख्येने वाढत आहे. मागणी आहे पण सोय नसल्याने महागड्या आणि असुरक्षित प्रवासावर भर द्यावा लागतो. दरम्यान बेळगावहून तिरुपतीला आठवड्यातून तीनवेळा रेल्वेची सोय होण्याची आवश्यकता रेल्वे प्रवाशांतून व्यक्त होत आहे.

विमानप्रवास साऱ्यांनाच परवडणारा नाही. शिवाय रस्ते वाहतुकीत अपघात आणि इतर धोके आहेत. दरम्यान बेळगाव तुरूपतीसाठी आठवड्यातून तीनवेळा रेल्वेसेवा मिळाल्यास यातून भाविकांची सोय आणि रेल्वेची महसूल वृद्धी हे दोन्ही उद्देश साध्य होऊ शकणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.