बेळगाव लाईव्ह :शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री तसेच संबधीत मंत्र्यांनी भेटण्यासाठी वेळ द्यावा, अन्यथा राणी कित्तूर चन्नमा चौक ते सुवर्णसौधपर्यंत मोर्चा काढून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटना-हरित सेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना शेतीकडे वळविण्यात यावी या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना-हरित सेनेतर्फे काल काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
या बैठकीप्रसंगी शेतकरी नेत्यांनी वरील प्रमाणे आंदोलनाचा इशारा दिला. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शेतकरी नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. पिकांची पेरणी, कापणी वगैरे शेतीच्या हंगामात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना शेतीकडे वळवावी.
सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सरसकट सर्व कर्जे माफ करावीत. शेतीसाठीचा वीज पुरवठा रात्री ऐवजी दिवसा 10 ते 12 तास केला जावा. पंतप्रधान पिक विमा योजनेचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जावेत.
रिंग रोड वगैरे सारख्या विकास प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीचे संपादन ताबडतोब थांबवावे. त्याऐवजी विकास कामांसाठी पडीक जमिनीचा वापर करावा, अशा आपल्या मागण्या असल्याचे शेतकरी नेत्यांनी बैठकीत स्पष्ट केले. तसेच आमच्या या मागण्या सरकार समोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांशी आमची भेट घडवून द्यावी. अन्यथा कर्नाटक राज्य रयत संघटना-हरित सेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आम्ही शहरातील राणी कित्तूर चन्नमा चौकपासून सुवर्णसौधपर्यंत भव्य मोर्चा काढून आंदोलन छेडू, असा इशारा नेते मंडळींनी बैठकीत दिला.
सदर जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीस ज्येष्ठ शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई, कर्नाटक राज्य रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सत्यप्पा मल्लापुर, राज्य रयत संघटना संचालक गणेश इळीगेर, रयत संघटना बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे आदींसह कडोली, गोकाक वगैरे विविध ठिकाणचे शेतकरी उपस्थित होते.