बेळगाव लाईव्ह विशेष:यावर्षी पावसाचे प्रमाण अतिशय कमी होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे बेळगाव शहर परिसरात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. शहराला येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र त्यानंतर कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार महिन्यांसाठी पाण्याचे योग्य पद्धतीने काटेकोर नियोजन करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आता महापालिकेबरोबरच जनतेची देखील असणार आहे.
यंदा पावसाने दिलेली हुलकावणी लक्षात घेता पाण्याचा गैरवापर आणि अपव्यय टाळणे ही काळाची गरज आहे. पाण्याच्या नियोजनासंदर्भात नगरसेवकांनी आवाज उठवण्याची, महापालिकेत तसा ठराव मंजूर करणे आवश्यक आहे. बांधकाम क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. पाणी टंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन ठरावाद्वारे बांधकाम क्षेत्रासह संबंधित अन्य क्षेत्रांमध्ये केल्या जाणाऱ्या अमर्याद पाणी वापरावर बंदी घातली जावी. एकंदर पाण्याची बचत व्हावी आणि पाणी टंचाईवर मात करता यावी यासाठी आत्तापासून विविध मार्गाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी सर्वप्रथम महापालिकेने पुढाकार घेणे आवश्यक आहे सर्वात आधी मनपाच्या पाणी गळत्या बंद करण्याच्या सूचना पाणी पुरवठा महा मंडळाला देणे जरुरी बनले आहे कारण हजारो लिटर वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी मनपा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहिरी, तलाव, कुपनलिका (बोअरवेल) आदींस्वरूपातील खाजगी जलस्त्रोत व सार्वजनिक जलस्त्रोत कोठे कोठे आहेत? याची प्रथम नोंदणी करून घेतली जावी. तसेच त्या जलस्त्रोतांचा वापर कोणत्या कारणांसाठी केला जातो याची नोंद होणे देखील गरजेचे आहे.
कारण यंदा पावसाअभावी जमिनीखालील भूजल पातळीत देखील घटलेली असणार आहे. परिणामी बेळगाव परिसरातील नैसर्गिक भूजल साठा मर्यादित असणार आहे. या पाणीसाठ्याचा जर मोठ्या प्रमाणात अमर्याद उपसा झाला तर येत्या काळात बेळगावमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू शकते.
याकरिता खाजगी विहिरी, बोअरवेल तसेच सरकारी विहिरी बोअरवेलमधील पाणी उपशावर आत्तापासूनच निर्बंध घालणे गरजेचे आहे. याखेरीज वाहन सर्विसिंग सेंटर्स, बांधकाम क्षेत्र वगैरे ठिकाणी पाण्याचा जो हवा असतो वापर केला जातो त्याला चाप लावणे आवश्यक आहे.
अयोग्य पद्धतीच्या पाणी वापरा संदर्भात संबंधितांना समज दिली जावी. यासाठी महापालिकेने पुढाकार घेणे गरजेचे असून नगरसेवकांनी तसा ठराव करण्यास काहीच हरकत नाही तसेच त्या ठरावाची महापालिकेसह सामाजिक संस्था व जनतेने काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे. थोडक्यात सर्वांनी आत्ताच सावध होऊन गांभीर्याने पाण्याची नियोजन सुरू केल्यास आगामी उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करणे आपल्याला शक्य होणार आहे.