बेळगाव लाईव्ह:भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) नुकत्याच जाहीर केलेल्या विमान प्रवासी संख्येच्या ताज्या यादीनुसार बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली असून गेल्या ऑक्टोबर महिन्यात ही संख्या तब्बल 44.51 टक्क्यांनी लक्षणीय वाढली आहे.
मागील कांही महिन्यात घटलेली बेळगाव विमानतळाची (आयएक्सजी) प्रवासी संख्या गेल्या ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या दिल्ली -बेळगाव विमान फेरीमुळे पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या ऑक्टोबर 2023 मध्ये विमानतळावरून एकूण 29,285 प्रवाशांनी प्रवास केला.
त्या तुलने त्याआधी सप्टेंबर महिन्यात विमान प्रवास केलेल्या प्रवाशांची संख्या 20,265 इतकी होती. त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या ऑक्टोबर महिन्यात प्रवासी संख्येत 9,020 इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्ली -बेळगाव -दिल्ली विमान फेरीमुळे ही वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याखेरीज एएआयच्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये बेळगाव विमानतळावरून 578 विमान उड्डाणे झाली. याद्वारे 1 मेट्रिक टन पेक्षा कमी कार्गो वाहतूक केली गेली. त्यामुळे फक्त प्रवासीच नव्हे तर बेळगाव विमानतळावरून विविध साहित्य व मालाची देखील लक्षणीय वाहतूक झाली आहे. बेळगाव विमानतळ हे सध्या नवी दिल्ली, बेंगलोर, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, सुरत, जोधपुर, जयपुर आणि तिरुपती या शहरांना जोडले गेले आहे.
स्टार एअरलाइन्सकडून बेळगाव येथून अहमदाबाद, जोधपुर, मुंबई, सुरत, तिरुपती, नागपूर, जयपुर आणि अहमदाबाद मार्गे भुज अशा थेट विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे इंडिगो एअरलाइन्सकडून बेळगाव ते नवी दिल्ली, बेंगलोर (दोन फेऱ्या) आणि हैदराबाद या ठिकाणी दैनंदिन विमानसेवा सुरू आहे.
बेळगाव विमानतळावरून गेल्या 2 वर्षापासून प्रवासी वाहतूक वाढली आहे. गेल्या 2021 मध्ये 3 लाख 31 हजार 458 प्रवाशांनी प्रवास केला तर 7224 उड्डाणे झाली. तसेच 2022 मध्ये 3 लाख 28 हजार 573 प्रवाशांनी विमान प्रवास केला असून 5917 उड्डाणे झाली आहेत. यामुळेच राज्यातील व्यस्त विमानतळ म्हणून बेळगाव विमानतळाने आपली ओळख निर्माण केली आहे.