बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर ग्रामपंचायत च्या व्याप्ततील पाणी पुरवठा संदर्भात नाल्याला लागून असलेली धोकादायक स्थितीतील विद्युत वाहिनी रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा अश्या अनेक मागण्या येळ्ळूर ग्रामपंचायतीकडून हेस्कॉमकडे करण्यात आल्या.
मंगळवारी हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता नवीनकुमार चिक्कोडे यांना भेटून निवेदन देण्यात आले.
येळ्ळूर गावातली इतर ठिकाणी जीर्ण झालेले खांब हटवून नविन खांब उभारणी करण्यासंदर्भात तसेच ग्रामदेवता चांगळेश्वर देवी परिसर आवारा शेजारी जिथं एक शाळाही आहे आणि जिथं गावातील यात्रोत्सव आणि इतर धार्मिक कार्यक्रम होतात, अशा सार्वजनिक ठिकाणी जे धोकादायक स्थितीतील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या आहेत त्या काढून केबलची व्यवस्था करावी जेणेकरून कोणताही धोका उद्भवणार नाही, अपघात घडणार नाही. गावातील काही ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर्स धोकादायक स्थितीमध्ये आहेत ते तेथून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, तसेच येळ्ळूर येथील विस्तारीत क्षेत्रात केईबीच्या माध्यमातून खांब उभारून पथदिपाची सोय करावी अशा विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात याआधीही अनेक वेळा हेस्कॉमला निवेदन देण्यात आले असून याकडे जाणूनबुजून अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले होतं. येळ्ळूर ग्रामपंचयतीच्यावतीने कोणतीही थकबाकी शिल्लक नाही शिवाय वेळोवेळी विद्युत बिले भरण्यात आलेली आहेत असे असतानाही असे दुर्लक्ष का?? असा सवाल उपस्थित करत यावेळी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे निवेदन देण्यात आले आहे.
या विभागातील, विभाग अधिकाऱ्यांनी दोन वर्षात कोणतेही काम केलेले नाही त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी आणि यावेळी तरी या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित समस्या सोडवाव्यात अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकऱ्यांकडे करण्यात आली.
यावेळी हेस्कॉम अधीक्षक अभियंता नवीनकुमार चिक्काडे यांनी या निवेदनचा स्वीकार करून जी काही कामे झाली नाहीत ती नेमकी का झाली नाही याचा जाब त्या विभाग अधिकाऱ्यांना विचारून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
आणि या संदर्भात त्वरित पावले उचलून कामे पूर्ण केली जातील असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील , माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, उपस्थित होते.