बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल धरणाच्या नवीन महिन्यांचे प्रलंबित काम तातडीने सुरू करावे असे आदेश नगर विकास मंत्री भैरती सुरेश यांनी दिले आहेत.
हलगा येथील सुवर्णसौधमध्ये शुक्रवारी बेळगाव विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बेळगाव महापालिकेच्या व्याप्तीत 786 कूपनलिका आहे. शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. त्यावर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी हिडकल जलाशयातून शहरापर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचे आदेश असून एनओसी नसल्यामुळे वनविभागाने काम बंद केले आहे. याबाबत वन मंत्री ईश्वर खंड्रे यांच्याशी चर्चा करून सध्याच्या पाइपलाइनच्या बाजूला नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी तातडीने एनओसी देण्यात यावी, असे मंत्री सुरेश यांनी वन खात्याच्या अधिकार्यांना सूचना केल्या. त्यामुळं बेळगाव शहराला पाणी पुरवठयासाठी नवीन वाहिन्या घालण्यात येणार आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार विभाग पातळीवर निर्धारित कालावधीत इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात यावीत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, बोअरवेलची दुरुस्ती, पाईप लाईन घालण्यायासह जनतेला पुरेशा सेवा पुरविण्यात याव्यात, अशा सूचनाही नगरविकास मंत्र्यांनी केल्या.
सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोेचवण्यासाठी सर्व अधिकार्यांनी काम करावे. अधिकार्यांच्या समन्वयातून विकासकामांना सुरुवात करावी. गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला लाभ देण्यासाठी शासनाने इंदिरा कॅन्टीन ही योजना लागू केली आहे. आवश्यक ठिकाणी कॅन्टीन तातडीने सुरू करण्यात याव्यात, असे ते म्हणाले.
बेळगाव शहरात एकूण 9 इंदिरा कॅन्टीन आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 25 हजार लोकसंख्या असलेल्या ठिकाणी 1 इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात यावे. गोकाकच्या कार्यक्षेत्रात 79 हजार लोकसंख्या त्या ठिकाणी तातडीने कॅन्टीन सुरू करण्याबाबत पावले उचलावीत, असे ते म्हणाले.
शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये. आवश्यक ठिकाणी बोअरवेलची व्यवस्था करावी. निधीची कमतरता असल्यास तत्काळ शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, असेही ते म्हणाले.
यावेळी महापालिका प्रशासन मंत्री रहीम खान, आमदार गणेश हुक्केरी, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, आमदार महेश तम्मनवर, बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ, महापालिका प्रशासन संचालक एन. मंजुश्री, केयूआयडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक बी. सरथ, बेळगाव विभागाचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हास्तरीय नियोजन कक्षाचे नियोजन संचालक मल्लिकार्जुन कलादगी, बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी या बैठकीला उपस्थित होते.