धनगर समाजाचे प्रभावी नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे उद्या मंगळवार दि. 3 ऑक्टोबर रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा सुरळीत पार पडावा यासाठी उद्या मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून शहर परिसरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला असून हा बदल मुख्यमंत्र्यांचे शहरातील कार्यक्रम समाप्त होईपर्यंत कायम असेल.
बेळगाव शहरातील नेहरू क्रीडांगणावर उद्या मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी धनगर समाजाचा भव्य अखिल भारतीय अधिवेशन, त्याचप्रमाणे 9 वे वार्षिक राष्ट्रीय प्रतिनिधींचे अधिवेशन आणि राष्ट्रीय सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांना खास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या बेळगाव दाखल होणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा लक्षात घेऊन पुढील प्रमाणे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. निपाणी, अथणी, चिक्कोडी, संकेश्वर, यमकनमर्डी, काकती येथून लोकांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला घेऊन येणारी वाहने राष्ट्रीय महामार्ग 48 मार्गे निसर्ग धाबा समोरील सर्व्हिस रोड वरून श्रीनगर गार्डन शिवबसवनगर रस्त्यावर लोकांना उतरवतील आणि तेथून परत निसर्ग धाबा, केएलई छत्री, हिंडाल्को अंडर ब्रिज मार्गे हिंडाल्को मैदानावर जाऊन थांबतील.
गोकाक, कणबर्गीकडून लोकांना कार्यक्रमाला घेऊन येणारी वाहने कनकदास सर्कल अशोकनगर मार्गे एस जी बाळेकुंद्री इंजीनियरिंग कॉलेज मैदानावर जाऊन थांबतील. बागलकोट, रामदुर्ग, यरगट्टी या बाजूने लोकांना कार्यक्रमासाठी घेऊन येणारी वाहने कनकदास रस्त्याने अशोकनगर, शिवबसवनगर, केपीटीसीएल कल्याण मंडप मार्गे केपीटीसीएल पार्किंगच्या ठिकाणी येऊन थांबतील. वेंगुर्ला सावंतवाडी सुळगा या बाजूने लोकांना घेऊन येणारी वाहने हिंडलगा फॉरेस्ट नाका, बॉक्साईट रोड हिंडलगा, गांधी सर्कल, पॉईंट रोड हनुमाननगर रोड मार्गे नेहरूनगर रेड्डी भवनच्या शेजारील मैदानावर येऊन थांबतील.
खानापूर, कारवार, हल्याळ या बाजूने लोकांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला घेऊन येणारी वाहने सरदार मैदानावर पार्क करावी लागतील. चिक्कोडी, निपाणी, यरगट्टी, बागलकोट, विजयपुर, गोकाक या ठिकाणी लोकांची ने -आण करणाऱ्या केएसआरटीसीच्या बसेस किल्ला तलाव, अशोक सर्कल, लेक व्ह्यू हॉस्पिटल, कनकदास सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर जातील. त्याचप्रमाणे हुबळी, धारवाड, बैलहोंगल, सौंदत्ती, कित्तूर, हिरेबागेवाडी येथे ये -जा करणाऱ्या केएसआरटीसीच्या सर्व बसगाड्या आणि इतर वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 ला जोडणाऱ्या जुन्या पीबी रोड वरून अलारवाड सर्व्हिस रोड मार्गे जातील.
खानापूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या केएसआरटीसीच्या बसेस मध्यवर्ती बस स्थानक चौक (मार्केट पोलीस स्टेशन), संगोळ्ळी रायन्ना सर्कल, राणी चन्नम्मा सर्कल आणि कॉलेज रोड मार्गे ये-जा करतील. तातडीच्या रुग्णसेवेसाठी केलेली हॉस्पिटल येथे येणाऱ्या रुग्णवाहिकांना केएलई छत्री आणि कनकदास सर्कल येथून जाण्यास परवानगी असणार आहे.