बेळगाव लाईव्ह:बेळगाव वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत वाघांची शिकार करून तस्करी करणाऱ्या कुख्यात शिकारी मध्य प्रदेशचा ‘चिक्का’ उर्फ कृष्णा पट्टेपवार याला अटक केली आहे. गेल्या शुक्रवारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वन्यजीव गुन्हेगारी विरुद्धच्या लढ्यात वनखात्याला मोठे यश लाभले आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये चिक्का याच्या नावावर विविध स्वरूपाचे वन्य गुन्हे दाखल आहेत. खास करून मागील वर्षी त्याने महाराष्ट्रात वाघ आणि अस्वलांच्या बेकायदेशीर शिकारी केल्या आहेत. बेळगाव वनविभागाच्या खानापूर तालुक्यातील खानापूर प्रादेशिक वन विभागात असलेल्या जळगा येथील जंगलातून गेल्या जुलै महिन्यात चंदनाची झाडे चोरीला गेली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत खानापूर उपविभागाच्या वनाधिकाऱ्यांनी गुन्हेगारांचा तपास सुरू केला असता आरोपी चिक्का हा कणबर्गी जवळ दडून बसल्याची माहिती मिळाली. तेंव्हा खानापूरच्या वनाधिकाऱ्यांनी बेळगाव विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कणबर्गी जवळ सापळा रचला आणि चिक्का उर्फ कृष्णा पट्टेपवार याला अटक केली.
तसेच त्याच्या जवळील चंदन आणि कांही धारदार शस्त्रे जप्त करण्यात केली. ही कारवाई बेळगाव परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षणाधिकारी मंजुनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव विभागाचे उप वनसंरक्षणाधिकारी शंकर कल्लोळीकर, खानापूर उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. संतोष चव्हाण, प्रादेशिक वनाधिकारी नागराज बाळेहोसुर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
खानापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चिक्काची सखोल चौकशी केली असता चिक्काने महाराष्ट्रातील मेळघाट जंगलात वाघ आणि अस्वलांची शिकार केल्याचे कबूल केले आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील जंगलातही त्याने वाघाची शिकार केली आहे. कांही वर्षांपूर्वी मृत्यू पावलेला वाघांचा कुख्यात शिकारी संसारचंद याच्या टोळीचा चिक्का हा सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यामुळे वन खात्याने चौकशीसाठी महाराष्ट्र वनखाते आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे अधिकारी राजेंद्र गारवाड यांच्याशी संपर्क साधून कृष्णा पट्टेपवार यांच्याबाबत माहिती दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. चिक्का उर्फ कृष्णा पट्टीपवार हा मूळचा मध्य प्रदेशातील दावो जिल्ह्यातील संगोनी गावचा रहिवासी असून तो वन्य प्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय तस्करांपैकी एक असल्याचा कयास आहे.