बेळगाव लाईव्ह :कर्म भूमी फाउंडेशन आणि एके प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 29 ऑक्टोबर 2023 रोजी ‘विल ऑफ गाॅड 2के23’ दैव इच्छे सिझन 1 या तृतीय पंथीयांसाठींच्या (किन्नर) कर्नाटकातील पहिल्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले असल्याची एके प्रोडक्शनचे प्रमुख आर्यन कुमार यांनी दिली.
शहरातील सर्किट हाऊस येथे आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या समवेत कर्म भूमी फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका डॉ. श्वेता पाटील या देखील हजर होत्या.
आर्यन कुमार म्हणाले की, एके प्रोडक्शन हे माझे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. यापूर्वी मी स्त्री-पुरुषांचे या पद्धतीचे अनेक फॅशन शो केले आहेत. मात्र आता पहिल्यांदाच हा किन्नरांसाठीचा फॅशन शो करत आहे. कर्म भूमी फाउंडेशनच्या सहकार्याने हा शो होणार असून या शोचा मुख्य उद्देश किन्नरांना एक व्यासपीठ मंच उपलब्ध करून देणे हा आहे.
समाजामध्ये आज त्यांना एका वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं जे चुकीच आहे. फॅशन शो हा स्त्री आणि पुरुष सहजपणे करू शकतात. असल्यामुळे किन्नरांना पुढे आणण्यासाठी तसेच समाजाही त्यांच्या बाबतचा दृष्टिकोन बदलावा यासाठी हा फॅशन शो आम्ही आयोजित करत आहोत.
किन्नरांमध्ये देखील उत्तम प्रतिभा दडलेली असते. परंतु ती प्रतिभा समाजासमोर आणण्यासाठी त्यांच्याकडे व्यासपीठ नाही. जे आम्ही त्यांना उपलब्ध करून देत आहोत. या फॅशन शो चे आयोजन करताना मला अतिशय आनंद होत आहे. कारण या शोला माननीय मंत्री सतीश अण्णा जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेंव्हा माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे या फॅशन शोला उपस्थित राहून किन्नरांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन आर्यन कुमार यांनी केले.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, किन्नरांकडे पुरुष व महिलांपेक्षाही चांगली प्रतिभा असते. मात्र फॅशन शो सारख्या क्षेत्रात त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात नाही. खरंतर किन्नर हे महिलांपेक्षाही उत्तम प्रकारे फॅशन शो करू शकतात. मंचावर वावरू शकतात. या फॅशन शोद्वारे त्यांना त्यांच्या चौकटी बाहेर मंचावर आणून त्यांच्यातील प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
या फॅशन शो नंतर संबंधित किन्नर समाजात ताठ मानेने वावरू शकतील. त्यांना नोकऱ्याही मिळतील अशी मला आशा आहे. याखेरीज मी स्वतः या फॅशन शो मधील विजेत्यांना घेऊन एक वेब सिरीज तयार करणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सिरीज जेंव्हा रिलीज होईल. वेब सिरीजमध्ये झळकताच संबंधित किन्नरांच्या नावासमोर अभिनेत्री (ॲक्ट्रेस) हे संबोधन लागेल जी अभिमानास्पद बाब असेल. स्क्रीनवर त्यांची प्रतिभा दिसून आल्यामुळे भविष्यात त्यांच्याकडे एका वेगळ्या पातळीवरून पाहिले जाईल.
फॅशनच्या क्षेत्रात कर्नाटकमध्ये किन्नरांसाठी आजपर्यंत काहीही झालेलं नाही आणि म्हणूनच कर्नाटकात पहिल्यांदाच आम्ही बेळगाव येथून किन्नरांसाठी फॅशन शो सुरु करत आहोत. जो भविष्यात राज्यात अन्य ठिकाणी तसेच परराज्यात आयोजित केला जाईल अशी माहिती देऊन फॅशन शोसाठी सरकारकडून आम्हाला सध्या तरी कांही मदत मिळत नसली तरी भविष्यात किन्नरांसाठी नोकऱ्या वगैरे किंवा एखादे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे आर्यन कुमार यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस इमरान तपकीर, किरण बेदी, निकिता तरळे, तानाजी सावंत, श्रेया काकतीकर आदी उपस्थित होत.