बेळगाव लाईव्ह :नवरात्रोत्सवाला रविवारीघ टस्थापनेपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या डोंगरावर तयारीला जोर आला आहे.
यंदा कर्नाटकात महिलांना मोफत बसप्रवास असल्याने याकाळात महिलावर्ग मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कंबर कसली आहे. तसेच कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश येथून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी प्रशासनाकडून मंदिराची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यंदा १० लाखांहून अधिक भाविक येणार असल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी एस. बी. पी. महेश यांनी दिली.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. प्रामुख्याने प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी तसेच नवरात्रीत देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. प्रत्येक वर्षी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमधील पौर्णिमाला भरणाऱ्या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी असते. नवरात्रोत्सव काळातही सौंदत्ती डोंगरावर प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी विविध कामे हाती घेतली आहेत.
१५ पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. तब्बल दहा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छता, पथदीप, दर्शन व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. मंदिराच्या आवारात ४० छोटे तर ५ मोठे जलकुंभ उभारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
डोंगरावर विविध ठिकाणी पाण्याचे नळ बसविण्यात आले आहेत. स्वच्छतेसाठी अतिरिक्त सफाई कामगार तैनात करण्यात आले आहेत. डोंगरावरील सर्व पथदीपांची दुरुस्ती करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारणे, स्नानकुंडावर गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना, डोंगरावर येण्यासाठी असलेल्या तीन रस्त्यावर नाकेउभारण्याबरोबर विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
यात्राकाळात डोंगरावर वाहनांची होणारी प्रचंड गर्दी होते, याकडे लक्ष देऊन विविध निर्धारित ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्याबाबत पोलिस खात्याला कळविण्यात आले आहे.
सहकार्य करण्याचे आवाहन
मंदिर प्रशासनाच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त तयारी करण्यात येत आहे. भाविकांना व्यवस्थितरित्या देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भाविकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिराचे कार्यकारी अधिकारी एस. बी. पी. महेश तसेच मंदिर देवस्थान अधीक्षक अरविंद माळगी यांनी केले आहे.