बेळगाव लाईव्ह:सौंदत्ती येथील डोंगरावरील श्री रेणुका देवी अर्थात श्री यल्लमा देवी मंदिर परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच त्या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या सोयी -सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी एका निवेदनाद्वारे शहरातील महिला भाविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच मागणीची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील महिला भाविकांनी आज सोमवारी सकाळी माजी नगरसेविका सुधा भातकांडे आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रमोद हजारे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याची आश्वासन दिले. निवेदन सादर करतेवेळी प्रमोद हजारे यांनी अधिकाऱ्यांना निवेदनातील मागण्यासंदर्भात माहिती दिली.
यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी नगरसेविका सुधा भातकांडे म्हणाल्या की, सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवी परिसर स्वच्छ ठेवावा. देवस्थानात स्वच्छता राहावी या मागणीसाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास आलो आहे. कारण आम्ही स्वतः दसरा सण आणि अधीक मासामध्ये दिलेल्या भेटीप्रसंगी त्या ठिकाणी अस्वच्छतेचे वातावरण पाहिले आहे. जोगनभावी येथे तर भाविकांचे कपडे इतस्ततः पडलेले असतात. आंघोळ केल्यानंतर त्या ठिकाणी महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी खोल्यांची सोय नाही.
तेंव्हा सदर देवस्थान परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच जोगनभावी येथे महिलांना कपडे बदलण्यासाठीच्या खोल्यांची सोय केली जावी. श्री यल्लमा डोंगरावर जिल्हासह परगावातून असंख्य भाविक येत असतात. तेंव्हा त्या ठिकाणी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांसाठी दर्शनाची वेगवेगळी सोय केली जावी. सध्या बॅरिकेड्स घालून देवदर्शनासाठी जी सोय करण्यात आली आहे.
तथापि त्या ठिकाणी मोठी गर्दी होऊन दर्शनासाठी इतका विलंब लागतो की बरेच जण भोवळ येऊन पडतात. तेंव्हा आमची जिल्हाधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी श्री यल्लमा डोंगरावर कायम स्वच्छता राखली जाईल अशी उपाययोजना करावी. तसेच आमची ही मागणी येत्या पौर्णिमेच्या आत पूर्ण न झाल्यास आम्ही महिला उग्र आंदोलन छेडू, असा इशारा माजी नगरसेविका भातकांडे यांनी दिला. याप्रसंगी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.