बेळगाव लाईव्ह: बेक्कीनकेरी (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायत व्याप्तीतील पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पासाठी अतिवाड गावच्या शेतकऱ्यांनी देऊ केलेल्या शेत जमिनीची गेल्या 15 वर्षापासून प्रलंबित असलेली नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा अतिवाड ग्रामस्थांतर्फे राष्ट्रीय रयत संघाने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत राजकीय नेत्यांना सुबुद्धी यावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 नारळही फोडण्यात आले.
अतिवाड येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय रयत संघाचे पूर्वीचा कर्नाटक राज्य रयत संघ नेते प्रकाश नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 नारळ फोडून उपरोक्त मागणीची निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित मुख्यमंत्र्यांकडे धाडण्याचे आश्वासन दिले.
अतिवाड गावच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाकरिता तलाव निर्मितीसाठी लघुपाट बंधारे खात्याकडून गावातील शेतकऱ्यांच्या 60 एकर सुपीक जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे मात्र त्याची नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना गेली पंधरा वर्षे झाली अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे याकरिता सरकारने सध्याच्या बाजारभावानुसार संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची तात्काळ नुकसान भरपाई द्यावी त्याचप्रमाणे गेल्या 14 वर्षातील पीक नुकसान भरपाई देण्याबरोबरच आपली संपूर्ण शेत जमीन पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पासाठी गमावलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी शेत जमीन उपलब्ध करून द्यावी आमच्या या मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अतिवाड गावकऱ्यांनी आणि रयत संघाने घेतला आहे तरी याची गांभीर्याने दखल घेऊन मागण्यांची पूर्तता करण्याद्वारे शेतकऱ्यांचे हित साधावे, अशा आशयाचा तपशील मुख्यमंत्र्यांना धाडण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते प्रकाश नाईक म्हणाले की, अतिवाड येथील शेतकऱ्यांनी 15 वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी आपली सुमारे 60 एकर शेतजमीन देऊ केली होती. मात्र आजपर्यंत या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची नुकसान भरपाई मिळालेली नाही याकडे खरे तर या भागाच्या लोकप्रतिनिधींनी विशेष करून सध्या मंत्री पदावर असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लक्ष द्यावयास हवे होते. मात्र सर्वांचेच अतिवाड येथील पीडित शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.
माणुसकी हरवलेल्या या भ्रष्ट आणि दुष्ट राजकारणी लोकांना अक्कल येऊ दे यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 नारळ देखील फोडले आहेत. त्यामुळे यापुढे तरी त्यांनी लाज बाळगून अतिवाड येथील शेतकऱ्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्याचे निवारण करावे अन्यथा भविष्यात निवडणुकीसाठी नेतेमंडळी मताची याचना करावयास आल्यास आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकू. त्यावेळी कांही विपरीत घटना घडल्यास त्याला शेतकरी जबाबदार राहणार नाहीत. नेते मंडळींनी शेतकऱ्यांना मधे घेऊन राजकारण करू नये. चांगल्या गोष्टीसाठी राजकारण करावे. कारण त्यामध्ये त्यांचे भवितव्य आहे.
तेंव्हा येत्या तीन महिन्यात लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून अतिवाड गावच्या शेतकऱ्यांची समस्या सोडवावी ही आमची विनंती आहे. अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अतिवाड गावकरी आणि शेतकरी संघटनेने घेतला आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी राष्ट्रीय रयत संघाच्या अन्य पदाधिकारी व सदस्यांसह आनंद पाटील, यल्लाप्पा पाटील, गंगाराम सावंत, निलेश केसरकर, सातेरी केसरकर, बाळकृष्ण पाटील, परशराम बोकमूरकर, सातेरी महादेव केसरकर, विठ्ठल कालकुंद्रीकर, अशोक बेळगावकर, प्रकाश सुतार, सतीश पाटील, गजानन सुतार, कृष्णा सुतार आदींसह अतिवाड येथील बहुसंख्य स्त्री -पुरुष शेतकरी उपस्थित होते.