बेळगाव लाईव्ह:राज्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबर नंतर सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला असून येत्या 25 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे साखर संचालक एम. आर. रवी कुमार यांनी दिली आहे.
रवी कुमार हे न्यायालयीन दाव्याच्या सुनावणीसाठी काल गुरुवारी बेळगावला आले असता त्यांनी 25 ऑक्टोबरपासून साखर हंगाम सुरू करण्याबाबतच्या सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली. राज्यात विशेषतः उत्तर कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम उसाच्या वाढीवर झाला आहे. या परिस्थितीत ऊस तोडणी विलंबाने झाली तर उसाचे वजन कमी होईल आणि उताराही कमी येईल. यामुळे ऊस उत्पादक व कारखान्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कारखाने विलंबाने सुरू करण्याचा आधीचा निर्णय रद्द करण्यात आला असल्याचे एम. आर. रवी कुमार यांनी स्पष्ट केले. राज्यातील साखर कारखान्यांनी 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत आपल्या गळीत हंगामाला सुरुवात करावी असा आधीचा निर्णय होता. आता या निर्णयामध्ये बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांना देखील दिलासा मिळाला आहे.