बेळगाव लाईव्ह विशेष : नवरात्री उत्सवात ज्या भाविकांना महाराष्ट्रातील तुळजापूर येथील प्रसिद्ध आई श्रीतुळजा भवानी मंदिरात भेट देणे शक्य नाही त्यांच्यासाठी बेळगावात दर्शनासाठी हुबेहूब तुळजा भवानी मंदिराची प्रतिकृती कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाने उभारली आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर श्री तुळजाभवानीचे मंदिर उभारले. महाराजांच्या रायगडावरील राज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे यंदा नवरात्र उत्सवानिमित्त कांगली गल्ली नवरात्रोत्सव मंडळाने रायगडावरील श्री तुळजाभवानी मंदिराची भव्य अशी लक्षवेधी प्रतिकृती उभारली आहे.
कांगली गल्लीतील श्री तुळजाभवानी मंदिराचा भव्य असा सेटअप आत्तापासूनच साऱ्यांचे लक्ष वेधून घेत कौतुकाचा विषय झाला आहे. दरवर्षी नवरात्रीनिमित्त कांगली गल्ली नवरात्रोत्सव मंडळातर्फे आकर्षक देखावे उभारले जातात. भव्य देखाव्यांमध्ये दरवर्षी शास्त्रोक्त पद्धतीने देवतांच्या प्रतिकृती स्वरूपांची स्थापना केली जाते. गेल्या वर्षी या मंडळाने श्री बालाजी -पद्मावतीचे स्वरूप साकारले होते. तत्पूर्वी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी, श्री संतोषी माता आदी देवतांचे स्वरूप साकारण्यात आले होते.
आता श्री तुळजाभवानी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्याद्वारे ज्यांना तुळजापुरला देवीच्या दर्शनासाठी जाणे शक्य होत नाही अशा भाविकांसाठी बेळगावच्या कांगली गल्लीमध्ये आई श्री तुळजाभवानीच्या दर्शनाची सोय कांगली गल्ली नवरात्रोत्सव मंडळ करून देत आहे.
कांगली गल्लीतील श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये उद्या रविवारी नवरात्रीला देवीची मूर्ती स्थापण्यात येणार आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या दैनंदिन पूजाअर्चे बरोबरच नऊ दिवस सदर मंदिरात ललित पंचमीला कुंकुमार्चन, अष्टमीला श्री नवचंडीका हवन, देवीला काकणं भरणे आदी विविध विशेष धार्मिक कार्यक्रम तसेच दररोज विविध भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत.
या खेरीज दरवर्षीप्रमाणे येत्या रविवारी 22 ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे. गेल्या वर्षी महाप्रसादा दरम्यान भाविकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन कांगली गल्ली नवरात्रोत्सव मंडळातर्फे यंदा 15 हजार भाविकांसाठी महाप्रसाद केला जाणार आहे. नवरात्रीच्या काळातील या सर्व कार्यक्रमांना दरवर्षी शहरातील भाविक जोडले जात असतात. मात्र यावर्षी ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील लोकांना जोडण्याचा प्रयत्न कांगली गल्ली नवरात्रोत्सव मंडळाने केला आहे.
यावेळी आंबेवाडी, मुतगा वगैरे गावांमधील महिला भाविकांकडून देवीची ओटी भरली जाणार आहे. एकंदर कांगली गल्ली येथील नवरात्र उत्सव फक्त गल्लीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण बेळगावचा उत्सव व्हावा आणि आई श्री तुळजाभवानी देवीचा कृपाशीर्वाद बेळगाववासियांसह संपूर्ण भारतावर सदैव असावा अशी आमची इच्छा आहे, असे कांगली गल्ली नवरात्रोत्सव मंडळाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तोपिनकट्टी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितली.