बेळगाव लाईव्ह :महापौरांना कारणे दाखवा नोटीस आल्यापासून सत्ताधारी भाजप आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महापौर शोभा सोमणाचे यांनी
राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीला सरकार उत्तर देईल, असे वक्तव्य पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. तर आज शुक्रवारी राज्यपाल बेळगावात असून महापौर सोमणाचे यांच्यासह भाजप आमदार, खासदारांचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहेत. तर या वादात मराठा समाजाला ओढण्यात आले असून त्यावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. त्यामुळेच राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा शुक्रवारचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
महापौर शोभा सोमणाचे माझ्याविरोधात राज्यपालांना यांनी पत्र लिहिले आहे. त्याला आता राज्य सरकारच उत्तर देणार आहे असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटल आहे.
घरपट्टी वाढ ठरावावर झालेल्या तारखेची चूक, त्यानंतर आलेली कारणे दाखवा नोटीस यावरून महापालिकेत राजकारण तापले आहे. महापौर सोमणाचे यांनी जारकीहोळी यांच्याविरोधात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे तक्रार केली आहे. तर अधिकाऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी दक्षिण आमदार यांच्याविरोधात आंदोलन केले आहे. त्यामुळे, दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत चालले असून मंत्री जारकीहोळीही आक्रमक झाले आहेत.
घरपट्टी वाढ करण्याबाबत सरकारला माहित देताना अधिकाऱ्यांकडून तारखेची चूक झाली आहे. ही छोटीशी चूक असून ती मोठी चूक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न होत आहे आमदार पाटील यांनी महापौरांना विनाकारण राज्यपालांना पत्र लिहिण्यास भाग पाडले आहे असा आरोप त्यांनी केला.
महापौर सोमणाचे या आमदार पाटील यांच्य बाहुल्यासारख्या वागत आहेत. आमदार पाटील महापालिका अधिकाऱ्यांच्या बेकायदेशी कारभाराची केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे चौकशी करणार असल्याचे सांगत आहेत परंतु अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्य केले आहे का याची चौकशी राज्य सरकारच करते त्यामुळे त्यांना ही बाब सरकारला कळवायला नको का?असा सवालही त्यांनी केला.आमदार पाटील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी काहीही करू शकतात. उद्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना भेटले तर आश्चर्य वाटणार नाही, असा टोलाही पालकमंत्री जारकीहोळी यांनी हाणला.