बेळगाव लाईव्ह: घरपट्टी वाढीवरून नगर विकास खात्याकडून आलेल्या पत्राला उत्तर देताना राहिलेल्या त्रुटीला जबाबदार कोण यावरून महापालिका सत्ताधारी गट आणि पालकमंत्री विरोधी गटात जोरदार संघर्ष शनिवारच्या महापालिका बैठकीत पहायला मिळाला. त्या नगरविकास खात्याच्या पत्राला उत्तर देताना पालिका आयुक्तांना जबाबदार धरून त्यांच्यावर के पी एस सी आणि यू पी एस सी बोर्डाला पत्र लिहिण्याचा ठराव केलेल्या सत्ताधारी गट आणि दक्षिण आमदारांवर पालकंत्र्यांनी जोरदार आक्षेप घेतला.
महापालिका आयुक्तांकडून चूक झाली असेल मात्र त्यावरून राजकारण करणे योग्य नाही. वाटल्यास त्या संदर्भात सीओडी, सीआयडी चौकशीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात यावा असे स्पष्ट करून महापालिका आयुक्त विरुद्धच्या कारवाईला आक्षेप घेण्याबरोबरच आज शुक्रवारी झालेल्या बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी हे प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारकडे महापालिका बरखास्त करण्याची शिफारस केली जाईल, असा इशारा दिला.
बेळगाव महापालिका बरखास्त होईल की नाही? हे आता तरी बेळगावातील कुणी राजकारणी सांगू शकत नाही. मात्र बेळगाव महापालिकेच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा संघर्षाचा शिरकाव नक्कीच झालेला आहे. आज शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आगमन झाले आणि त्यांनी बैठकीमध्ये घरपट्टीच्या मुद्द्याबाबत महापालिका आयुक्तांनी आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. यासह यूपीएससी आयोग आणि केपीएससी आयोगाला महापालिका आयुक्तांच्या विरोधात पत्र लिहिण्याचे सत्ताधारी गटाने ठराव करून निश्चित केलेले आहे. त्या ठरावालाच सतीश जारकीहोळी यानी आक्षेप घेतला.
यावेळी सत्ताधारी गटाने चौकशीचा जो ठराव केला आहे त्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे ती सीओडी आणि सीआयडीमार्फत केली जाईल. या पद्धतीने जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करूया. घरपट्टी वाढीसंदर्भात सरकारला जो ठराव पाठवण्यात आला होता त्यावरील महापौरांची सही खरी आहे की खोटी? त्याचा शहानिशा या चौकशीतूनच होऊन जाईल असे जारकीहोळी म्हणाले. त्यावर सत्ताधारी गटाने जो ठराव मांडलेला आहे तोच मान्य असल्याचे सांगत बैठक गुंडाळली. तत्पूर्वी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी 134 सफाई कामगारांचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र तेवढ्यातच राष्ट्रगीत म्हणण्याव्दारे सत्ताधारी गटाकडून सभा आटोपती घेण्यात आली.
पालकमंत्र्यांनी डागली तोफ
घरपट्टी वाढीसंदर्भात जो मुद्दा महापालिकेमध्ये सध्या गाजत आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी जो ठराव पाठवला आहे त्यावर महापौरांची सही होती की नव्हती किंवा अधिकारी याला जबाबदार आहेत का? याची सीओडी मार्फत सखोल चौकशी करणार असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
याप्रसंगी बेळगाव दक्षिणचे आमदार अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप करत अधिकाऱ्यांना आपले हातचे बाहुले करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असेही त्यांनी सांगितले. महापालिकेत आपल्याला कोणी जाब विचारत नसल्याचा समज करून घेतल्यामुळे दक्षिणच्या आमदारांनी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे सत्र चालविले आहे. त्यांच्याकडून सर्वत्र दादागिरीचे प्रकार घडत असून त्याची कल्पना मला आहे. महापालिका आयुक्तांच्या चौकशी बरोबरच खाऊ कट्ट्यांमध्ये व बेळगाव स्मार्ट सिटीच्या कामामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे याची चौकशी, तसेच जय किसान भाजी मार्केटला कशी परवानगी देण्यात आली? त्याचीही चौकशी केली जाईल. स्मार्ट सिटी अंतर्गत बसवलेले पेव्हर्स आणि इलेक्ट्रिकचे खांब स्वतःच्या दयनीय स्थितीबद्दल अश्रू ढाळत आहेत असा टोलाही यावेळी सतीश जारकीहोळी यांनी लगावला.
जर दक्षिणच्या आमदारांच्या हस्तक्षेपातून सत्ताधारी गटाने यूपीएससी आणि केपीएससीच्या माध्यमाद्वारे महापालिका आयुक्ता विरोधात पत्र लिहून तक्रार केली तर आम्ही महापालिका बरखास्तेची शिफारस करू असा सज्जड इशारा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावेळी दिला. आमदारांना यूपीएससी अथवा केपीएससीकडे तक्रार करण्याचा अधिकार नाही जास्तीत जास्त ते सरकारकडे तक्रार करू करतात. आमदारांकडून तसे पत्र गेल्यास आम्ही महापालिका बरखास्त करण्याची शिफारस राज्य सरकारकडे करू. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना आयएएस दर्जाचे प्रमोशन मिळणार आहे.
त्यामुळेच दक्षिणचे आमदारांना पोटदुखी होत असल्याचा आरोप करत यापूर्वी अवघ्या एका वाक्यावर बेळगाव महापालिका बरखास्त झाली आहे. त्याच पद्धतीने यावेळी एका आमदारामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटातील इतर आमदारांचे नुकसान होणार आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. तसेच याचा महापौर व उपमहापौरांसह सत्ताधारी गटाने गांभीर्याने विचार करावा, असे पालकमंत्र्यांनी शेवटी स्पष्ट केले
https://x.com/belgaumlive/status/1715713231497400622?s=20