बेळगाव लाईव्ह :जहाल आणि मवाळ मार्गाने इंग्रजाविरुद्ध लढा देवून मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्या देशाची सीमा सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
सीमेच्या रक्षणासाठी आपले जवान डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात असतात. मातीशी नातं सांगणारी सांबरा येथील शेतकऱ्याची लेक देशाच्या सीमा रक्षणासाठी निघाली आहे.
भारतीय सैन्य, देशाविषयी असणारी निष्ठा आणि देशप्रेम यातून सैन्यात भरती होण्याचे स्वप्न सांबरा येथील प्रियांका गजानन जोगाणी हीने पहिले. तिने पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले आहे. तीची भारतीय सशस्त्र सीमा बल (SSB) दलात निवड झाली असून लवकरच ती प्रशिक्षणासाठी आसामला रवाना होणार आहे.
भारतीय सैन्यात सेवा बजावण्याचे ध्येय ठेवून ते साध्य करत इतर मुलींना तीची वाटचाल प्रेरणा देणारी ठरली आहे.
आपणाला शिक्षण घेण्यात अनेक अडचणी आल्या. ते मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी घरच्या परिस्थितीशी दोन हात करत शेती आणि मालवाहू रिक्षावर राबत गजानन जोगानी यांनी आपल्या मुला-मुलींना शिकवले. गजानन
यांना दोन मुली. त्यापैकी प्रियांकाची सैन्यात निवड झाली आहे.
तर लहान मुलगी तनिषा ही सध्या 12 वीमध्ये शिकत आहे. ती एक जुडो-कराटे खेळाडू आहे.
खेलो इंडिया नॅशनल दक्षिण झोनमध्ये कास्य पदक मिळविले आहे.
प्रियांकाचे प्राथमिक शिक्षण सांबरा येथील सरकारी आदर्श मराठी शाळेत झाले आहे. तर
माध्यमिक शिक्षण मुतगा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. तिने दहावीत 87% गुण मिळवले आहेत. तर मराठा मंडळ महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून 12 वी उत्तीर्ण झाली.
सध्या ती भरतेश कॉलेजमध्ये कॉम्पुटर अँप्लिकेशनच्या सहाव्या सत्राचे शिक्षण घेत आहे.
तीला वडील गजानन आई रेश्मा जोगाणी यांचा खंभीर पाठिंबा मिळाला आहे. सैन्यात भरती होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण तिने मुतगा येथील भावकेश्वरी स्पोर्ट्स अकादमीमध्ये घेतले आहे.