बेळगाव लाईव्ह:अलीकडे श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील रहदारीस अडथळा ठरणारे विजेचे खांब जसे हटविण्यात आले तसे बसवान गल्ली येथील रस्त्यामध्ये असलेले सिमेंटचे दोन इलेक्ट्रिक खांब तात्काळ हटविण्यात यावेत, अशी मागणी नागरिक हितरक्षण समिती बेळगावने एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
नागरिक हितरक्षण समिती बेळगावचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सादर केले आहे. शहराच्या मुख्य व्यावसायिक बाजारपेठेकडे जाणारा जोड रस्ता असल्यामुळे बसवान गल्ली येथे वाहनांची सतत रहदारी असते. रुंदीकरण करण्यात आलेल्या या गल्लीच्या रस्त्यावर (मराठा बँक भागात) नव्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. रस्ता रुंदीकरणामुळे या ठिकाणी असलेले सिमेंटचे दोन इलेक्ट्रिक खांब रस्त्यामध्ये आले असून सोबतच्या छायाचित्रात दिसत असल्याप्रमाणे या खांबांच्या डाव्या बाजूची खुली जागा व्यापारी आपल्या धंद्यासाठी वापरत आहेत, तर उजव्या बाजूची रस्त्याची जागा शेजारील इमारत मालक आपली कार पार्क करण्यासाठी वापरत आहे.
या प्रकारामुळे अरुंद झालेल्या सदर रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत असते. खास करून रात्रीच्या वेळी खांबांच्या ठिकाणचा रस्ता अपघात प्रवण बनलेला असतो. शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर अशा पद्धतीचे रहदारीस अडथळा ठरणारे लोखंडी अथवा सिमेंटचे अतिरिक्त खांब आहेत.
जमल्यास हे खांब श्री गणेशोत्सव काळात आमच्या सूचनेवरून हेस्कॉमने ज्या पद्धतीने किर्लोस्कर रोडसह विविध रस्त्यांवरील एकूण आठ खांब हटविले तसे हटवावेत. बसवान गल्ली येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचा मालक मास्टर प्लॅनच्या रस्ता रुंदीकरणातील सेटबॅक एरिया आणि पार्किंगची जागा छोटा कट्टा किंवा चेन घालून स्वतःसाठी वापरत आहे.
तरी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्यासह बसवान गल्लीच्या रस्त्यामध्ये असलेले इलेक्ट्रिकचे खांब तात्काळ हटविण्याचे आदेश द्यावेत, अशा आशयाचा तपशील जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.