बेळगाव लाईव्ह :रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशिक्षण देणाऱ्या (ट्रेनिंग) विमानांचा अपघात होत असल्याच्या कारणास्तव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) पुढील आदेशापर्यंत रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरचा देशभरातील परवाना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. यामध्ये बेळगावच्या सांबरा येथील रेडबर्ड ट्रेनिंग सेंटरचा देखील समावेश आहे.
सांबरा विमानतळावर गेल्या सहा महिन्यापूर्वी रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. निवृत्त लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांच्या हस्ते गेल्या 28 मार्च रोजी नवी दिल्ली येथे आभासी पद्धतीने या केंद्राचे उद्घाटन झाले होते.
मात्र आता अवघ्या सहा महिन्यात हे केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. रेड बर्ड कंपनीची बारामती (महाराष्ट्र), लिलाबारी (आसाम), गुलबर्गा, बेळगाव (कर्नाटक) सिवनी (मध्य प्रदेश) आणि कोलंबो (श्रीलंका) येथे एअरक्राफ्ट ट्रेनिंग सेंटर्स आहेत.
यापैकी बारामती येथील सेंटरच्या विमानांचा चार दिवसाच्या अंतराने दोन वेळा अपघात झाला आहे. बेळगाव मध्येही अलीकडच्या काळात असा प्रकार घडला होता. सुदैवाने ट्रेनिंग विमानांच्या अपघातामध्ये जीवित हानी झाली नाही. या पार्श्वभूमीवर बेळगावसह देशातील सहा ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या रेड बर्ड कंपनीची उड्डाणे डीसीजीएने थांबविली आहेत.
यासंदर्भात रेड बर्ड कंपनीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हंटले आहे की, गेल्या कांही दिवसात विमानांचे झालेले अपघात लक्षात घेता डीजीसीए रेड बर्ड कंपनीच्या विमानांचे सखोल परीक्षण करणार आहे. असेच प्रशिक्षकांची योग्यता आणि अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.
जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत देशभरातील रेड बर्ड कंपनीच्या ट्रेनिंग विमानांची उड्डाणे स्थगित राहतील. हा ई-मेल डिजीसीएचे उड्डाण प्रशिक्षण संचालक कॅप्टन अनिल गिल यांनी धाडला आहे.