बेळगाव लाईव्ह:सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलची इमारत तयार झाली आहे. गोरगरीबांच्या सेवेसाठी ते लवकर सुरु होणे गरजेचे आहे. परंतु, वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती रखडली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करुन येथे लवकरच डॉक्टर नियुक्तीसाठी प्रयत्न करु, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.
बिम्स, जिल्हा रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलसंदर्भातील विकास आढावा बैठक मंगळवारी बिम्स सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजू सेट, जिल्हाधिकारी नितेश पाटील, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालक सईदा बळ्ळारी, बिम्सचे संचालक डॉ. शेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. व्ही. शिंदे यावेळी उपस्थित होेते.
बिम्ससह जिल्हा रुग्णालयासाठी जादा डॉक्टरांची गरज आहे. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्र व गोव्यातील रुग्ण येथे येत आहेत. त्यामुळे, दर्जेदार व वेळेत उपचारासाठी डॉक्टरांची गरज आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रे, समुदाय आरोग्य केंद्रे व तालुका पातळीवरील रुग्णालयातही अशीच अवस्था आहे. पंतप्रधान आयुष्यमान भारत अभियानांतर्गत 50 बेडचे हॉस्पीटल सुरु होण्याची गरज आहे. बिम्स व जिल्हा रुग्णालयामध्ये 1,040 बेड आहेत. या ठिकाणी मातृ-बाल विभागासाठी 100 बेडचे आणखी एक हॉस्पीटल हवे असून त्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, निधीअभावी ते संथगतीने सुरु आहे, अशी माहिती अधिकार्यांनी पालकमंत्र्यांना दिली.
सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री जारकीहोळी यांनी सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यात नर्सिंग कोर्स करणार्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. शिवाय जिल्हा मोठा असल्यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल लवकर सुरु होणे गरजेचे आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी भरती लवकर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, पालकमंत्र्यांनी सुपर स्पेशालिटीची नूतन इमारत व परिसर तसेच बिम्स व जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.
सांडपाणी निर्मूलन प्रकल्पाची समस्या
बिम्स व जिल्हा रुग्णालय परिसरातील सांडपाणी प्रकल्प निर्मूलन प्रक्रिया पूर्णतः खराब झालेली आहे. त्यामुळे, हॉस्पीटल परिसरातच दुर्गंधी पसरलेली दिसून येते. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. या प्रकल्पाचे कामही लवकर संपावे, यासाठी बिम्स प्रशासनाकडून पाठपुरावा सुरु असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.