बेळगाव लाईव्ह:फोर्ट रोड येथील जिजामाता चौकातील हटवण्यात आलेला भगवा ध्वज असलेला ध्वज स्तंभ तेथील श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या पुढाकाराने पुन्हा बसविण्यात आल्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
फोर्ट रोडवरील जिजामाता चौकातील ध्वजस्तंभ कांही दिवसांपूर्वी अपघातामुळे एका बाजूला कलून कोसळण्याच्या स्थितीत तग धरून उभा होता. त्यामुळे धोकादायक बनलेला हा ध्वजस्तंभ पूर्ववत उभा करण्याऐवजी हटविण्यात आला होता.
हा स्तंभ पूर्ववत बसवावा अशी गेल्या आठ दिवसापासून सातत्याने मागणी केली जात होती. यासाठी फोर्ट रोड येथील श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता.
अखेर मंजुरी मिळताच त्यांनी स्वखर्चाने जिजामाता चौकातील ध्वजस्तंभ आता पुन्हा पूर्ववत उभा केला आहे. यामुळे परिसरातील दुकानदार आणि व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, फोर्ट रोड येथील दुभाजकामुळे जिजामाता चौकातील ध्वजस्तंभाच्या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याद्वारे ध्वज स्तंभाची सुरक्षितता वाढवावी, अशी मागणी यानिमित्ताने होऊ लागलेली आहे.