बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेत सुरू असणारा रणकंदन आता राज्यपाल यांच्याकडे पोहोचले आहे महापौरांनी चक्क राज्यपाल तक्रार केली आहे.
बेळगाव महापालिकेमध्ये अलीकडेच घडलेल्या घटनेसंदर्भात भेट घेण्यासाठी महापौर शोभा पायाप्पा सोमनाचे यांनी कर्नाटकच्या राज्यपालांना पत्र धाडले असून त्यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागितली आहे.
बेळगाव महापालिकेच्या गेल्या 21 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापालिका आयुक्तांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशा शिफारसीचा ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे. हा ठराव एससी, डीपीएआर आणि टीओपीटी या खात्यांकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्यास बेळगाव महापालिका बरखास्त केली जाईल असे जाहीर वक्तव्य केले होते.
या वक्तव्यामुळे शहरवासीयात चिंतेचे वातावरण पसरले असून हा प्रकार म्हणजे निवडून आलेल्या 58 नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या संदर्भात तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांसंदर्भात चर्चा करण्यासाठी महापौरांनी महापालिकेच्या सुमारे 37 सदस्यांची बैठक बोलावली आहे असेही तक्रारीत म्हटले आहे.
गेल्या 21 ऑक्टोबर रोजी बेळगाव महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेमध्ये महापालिका आयुक्त कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी आढळून आल्यामुळे यासंदर्भात राज्यपाल आणि यूपीएससीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दोषी अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केल्यास महापालिका बरखास्त करू असे जाहीर वक्तव्य केले आहे. महापालिका बरखास्त झाल्यास प्रशासन चालवणे शक्य होणार नाही. त्यामुळे या विषयावर आणि इतर विषयांवर जिल्हा पालकमंत्री जारकेहोळी नगरसेवकांना भीती दाखवत आहेत. तेंव्हा या संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावा, अशा आशयाचा तपशील राज्यपालांना धाडण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
दरम्यान, पलीकडेच राज्य सरकारने गेल्या तीन वर्षात करवाढ न केल्याबद्दल, पौरकार्मिकांच्या नेमणुका करताना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि अन्य कांही शिष्टाचार मार्गदर्शक सूचीचा भंग केल्याबद्दल बेळगाव महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.