बेळगाव लाईव्ह:कांगली गल्ली नवरात्रोत्सव मंडळातर्फे नवरात्रीनिमित्त उद्या रविवारी दुपारी 3 वाजता राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून देवीच्या मूर्तीची भव्य अशी शिवकालाची आठवण करून देणारी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
राणी चन्नम्मा सर्कल येथून काढण्यात येणाऱ्या या भव्य मिरवणुकीमध्ये सजवलेल्या हत्तीवरील अंबारीत देवीची चांदीची मूर्ती विराजमान असणार आहे.
याखेरीज सजवलेल्या 20 घोडे, 8 उंट यांचा समावेश असलेली शिवकालाची आठवण करून देणाऱ्या या मिरवणुकीत छ. शिवाजी महाराजांच्या देखाव्यात सदर सादर केली जाणार आहे.
या व्यतिरिक्त मंगळूर येथील दसरा उत्सवात भाग घेणाऱ्या पारंपारिक कला सादर करणाऱ्या कलाकारांचा सहभाग असणार आहे. एकंदर अतिशय भव्य अशी शिवकालीन मिरवणूक उद्या बेळगावकरांना पाहायला मिळणार आहे असे कांगली गल्ली नवरात्रोत्सव मंडळाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तोपिनकट्टी यांनी
बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.
त्याचप्रमाणे आपल्या मंडळांनी यंदा रायगडावरील श्री तुळजाभवानी मंदिराचा भव्य देखावा सादर केल्याचे सांगून कांगली गल्लीचा नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी दरवर्षी ऑल्वीन व विनोद पालकर, मूर्तिकार संजय किल्लेकर त्यांचा मुलगा सौरभ किल्लेकर, वृषभ कलमनी, दरवर्षी नवरात्र उत्सव काळात दररोज पहाटे 4 वाजता येऊन देवीच्या मूर्तीला साडी नेसवणारा कर्ले गावचा युवक प्रमोद यांच्यासह कांगली गल्लीतील सर्व महिला वर्गाचे मोठे योगदान असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.