बेळगाव लाईव्ह ;ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी विजापूर येथील एक पोलीस उपाधीक्षक, तसेच बेंगलोर मधील एका आयपीएस अधिकाऱ्याचे फेसबुक खाते हॅक करून फर्निचरचे आमिष दाखविण्यासह पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
अलीकडे काहीसे शांत असलेले ऑनलाइन भामटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. विजापूर मधील एका पोलीस उपअधीक्षकाचे फेसबुक खाते गेल्या सोमवारी हॅक करून त्याद्वारे भामट्याने आधी ‘हाय’ असा संदेश पाठवला. त्यानंतर समोरच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक मागून घेतला. तसेच आपला एक मित्र सीआरपीएफ मध्ये असून त्याची बदली जम्मूला झाली आहे.
त्यामुळे त्याच्या कडील साहित्य कमी किमतीत विकायचे आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील असे त्या भामट्याने समोरच्या व्यक्तीला सांगितले. तेंव्हा संबंधित व्यक्तीने आपल्या व्हाट्सअप क्रमांकावरून संदेश पाठवला.
दरम्यान मिळालेला मोबाईल क्रमांक त्या भामट्याने आपल्या जोडीदाराला दिला आणि आधी ठरल्यानुसार जोडीदाराने त्या व्यक्तीला फोन करून आपले नांव संतोषकुमार असल्याची बतावणी करत आपण सीआरपीएफ मध्ये अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच आपली बदली झाल्याने घरातील साहित्य कमी किमतीत विकायचे आहे असे सांगत 55 इंची टीव्हीसह किमती फर्निचरची छायाचित्रे पाठवली.
हे सर्व साहित्य आपल्याला फक्त 75 हजार रुपयांमध्ये विकायचे असून ते बेंगलोर मधील यलहंका येथे असल्याचे सांगितले. इतके सर्व साहित्य फक्त 75 हजाराला कसे काय? असा संशय आल्याने संबंधित व्यक्तीने आधी खाते हॅक करणाऱ्याला फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तो उचलला नाही. तेंव्हा सावध झालेल्या संबंधित व्यक्तीने त्या भामट्याचा क्रमांक ब्लॉक केला.
सदर घटनेला 12 तास उलटत नाही तोवर बेंगलोर मधीलच एका आयपीएस अधिकाऱ्याचे फेसबुक खाते भामट्यांनी हॅक केले आणि मेसेंजरवर संदेश पाठवून समोरच्या व्यक्तीकडे त्याचा मोबाईल क्रमांक मागितला. जेंव्हा तुम्ही मला संदेश पाठवताय म्हणजे माझा मोबाईल क्रमांक तुमच्याकडे आहे, तर मग पुन्हा का मागता? असा उलट प्रश्न संबंधित व्यक्तीने करताच तो भामटा निरुत्तर झाल्याचे समजते.