बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेला नियमितपणे मालमत्ता कर भरून देखील आम्हाला प्रॉपर्टी एक्सट्रॅक्ट देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तरी महापालिकेला निर्देश देऊन आम्हाला ताबडतोब प्रॉपर्टी एक्सट्रॅक्ट उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी उद्यमबाग येथील हनुमानवाडीच्या रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
खानापूर रोड, उद्यमबाग येथील हनुमानवाडीच्या रहिवाशांनी माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. पूर्वी पिरनवाडी ग्रामपंचायत आणि आता बेळगाव महापालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेली उद्यमबाग येथील हनुमानवाडी ही वसाहत 3 एकर 38 गुंठे जागेत वसली आहे येथील रहिवाशांनी 1989 मध्ये अधिकृत खरेदी पत्राद्वारे जागा खरेदी करण्याबरोबरच त्या जागेवर पिरनवाडी ग्रामपंचायतीकडून रीतसर परवानगी घेऊन घरे बांधली आहेत.
पंचायतीच्या कागदपत्रांमध्ये त्याची नोंदही आहे. त्याचप्रमाणे सर्व रहिवाशी 2013 पर्यंत पिरनवाडी ग्रामपंचायतीकडे नियमितपणे मालमत्ता कर भरत आले आहेत. अलीकडे हनुमान वाढीचा अंतर्भाव महापालिका कार्यक्षेत्रात (प्रारंभी प्रभाग 1 आणि सध्या प्रभाग 53) करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वजण आता बेळगाव महापालिकेकडे नियमितपणे कर भरत आहेत. ही वस्तुस्थिती असताना हनुमानवाडी येथील रहिवाशांना महापालिकेकडून प्रॉपर्टी एक्सट्रॅक्ट देण्यास नकार दिला जात आहे. जाब विचारल्यास पिरनवाडी ग्रामपंचायतीकडून आम्हाला अद्याप तुमचे रजिस्टर मिळालेले नाही असे उत्तर दिले जात आहे. त्यासाठी आम्ही बऱ्याचदा ग्रामपंचायत इकडे देखील विचारणा केली आहे.
मात्र त्यांच्याकडून आम्ही 2013 मध्येच तुमचे रजिस्टर महापालिकेकडे दिले आहे असे सांगून उडवा उडवीची उत्तरे देत दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आम्हाला प्रॉपर्टी एक्सट्रॅक्ट मिळणे कठीण झाले आहे. यासंदर्भात महापालिका आणि पट्टणपंचायत दोघांकडूनही खरी आणि योग्य माहिती दिली जात नाही आहे. तेंव्हा कृपया आमच्या तक्रारीची दखल घेऊन बेळगाव महापालिका आणि पट्टण पंचायतीला आम्हाला प्रॉपर्टी एक्सट्रॅक्ट देण्याचे निर्देश द्यावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ॲड. नागेश सातेरी म्हणाले की हनुमानवाडी ही खुली जागा नाही आहे. तेथे घरे असून 128 ते 130 कुटुंब तिथे राहतात. या कुटुंबांना महापालिकेने वाऱ्यावर सोडले आहे. तेंव्हा आम्हाला ताबडतोब आमचे प्रॉपर्टी एक्सट्रॅक्ट द्यावेत एवढी साधी मागणी आम्ही केली आहे असे सांगितले. निवेदन सादर करतेवेळी ॲड. सातेरी यांच्या समवेत नारायण जवळकर, अश्विन दड्डीका, कृष्णा सुतार, तेजस्वी कांबळे, आप्पाजी साळुंखे, राजू गुरव, प्रकाश अरोस्कर, शंकर नाईक, दीपक सावंत, रामचंद्र बाळेकुंद्री आदींसह बहुसंख्य हनुमानवाडीवासीय उपस्थित होते.