शारदीय नवरात्रोत्सवाला नुकताच बेळगाव शहर परिसरात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बेळगाव शहरातील जत्ती मठाची माहिती आणि तेथील नवरात्रोत्सव…
गेल्या कांही वर्षांपासून शहरातील जत्तीमठामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सध्या नवरात्रीला प्रारंभ झाल्यामुळे बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने जत्तीमठाला भेट देऊन विश्वस्त दत्ता जाधव यांच्याशी संवाद साधला. तेंव्हा ते म्हणाले की, जत्तीमठाला 350 वर्षांचा इतिहास आहे. खुद्द छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी येऊन गेले आहेत. विशेष म्हणजे जत्तीमठात फार पूर्वीपासून नागा साधू येत असतात. कुंभ मेळ्यानंतर हे साधू मंगळूरला जाताना परंपरेनुसार जत्तीमठाला आवर्जून भेट देतात.
या ठिकाणी किमान तीन दिवस त्यांचा मुक्काम असतो. या पद्धतीने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जत्ती मठामध्ये आम्ही दरवर्षी पारंपारिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करत असतो. गेल्या 15 वर्षांपासून या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने देवीची विविध रूप या ठिकाणी मूर्तीच्या माध्यमातून साकारली जातात. गेल्या वर्षी आम्ही कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती.
यावर्षी सुद्धा करवीर निवासीनी श्री अंबाबाई देवीची मूर्ती तर आहेच, शिवाय तिच्या समवेत देवीच्या रूपातील श्री स्वामी समर्थ देखील आहेत आणि बाहेर श्री तिरुपती बालाजी यांची मूर्ती स्थापण्यात आली आहे. श्री तिरुपती बालाजींचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीची दर्शन घेण्याची प्रथा आहे. ही प्रथा दर्शविणे हा बालाजींची मूर्ती स्थापना मागील उद्देश आहे.
त्यामुळे यावेळी भाविकांना जत्ती मठ येथे कोल्हापूरची श्री महालक्ष्मी देवी, श्री तिरुपती बालाजी आणि श्री स्वामी समर्थ यांचे एकत्र दर्शन घेण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन दत्ता जाधव यांनी केले. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसात मठामध्ये देवीची पूजा, अभिषेक वगैरे धार्मिक कार्यक्रमांसह भजन, कीर्तन, गोंधळ, स्त्रियांसाठी विशेष कार्यक्रम वगैरे विविध कार्यक्रम होणार असून महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली.
बेळगावच्या मंदिरांच्या इतिहासात श्री जत्तीमठाला अनन्य साधारण महत्त्व आहे. जवळपास साडेतीनशे वर्षाचा इतिहास असणाऱ्या या मठातील मंदिराला यात्रा करत दक्षिण भारतात येणारे नागा साधू आवर्जून भेट देत असतात. सध्या नवरात्री निमित्त जत्ती मठाच्या अंतर्गत भागात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
काल रविवारी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीची सिंहासना रूढ राजराजेश्वरी रूपातील पूजा बांधण्यात आली होती. सध्या नवरात्रीनिमित्त जत्तीमठामध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होताना पहावयास मिळत आहे.