Sunday, November 24, 2024

/

शेतकऱ्यांना अंधारात ठेवून झाडशहापुर येथे भूसंपादनाचा प्रयत्न?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हलगा -मच्छे बायपास आणि बेळगावच्या रिंग रोडचा सर्वाधिक फटका झाड शहापूर येथील शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यासाठी माहिती हक्क अधिकाराखाली रिंग रोडबाबत नकाशा व माहिती मागितली असता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे त्याच्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी दिली.

झाड शहापूर भागातील जमीन अत्यंत सुपीक असून या जमिनीत येथील शेतकरी वर्षाला दोन ते तीन पिके घेतात. मात्र तरीही गेल्या काही वर्षांमध्ये झाडशापुर येथे वेगवेगळ्या कारणाने भूसंपादन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच बायपास आणि रिंग रोडमध्ये या गावातील जमीन मोठ्या प्रमाणात जाणार आहे. यासंदर्भात शेतकरी नेते नारायण सावंत बेळगाव लाईव्हशी बोलत होते.

ते म्हणाले की, झाड शहापूर हे गाव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भूसंपादनाच्या कचाट्यात सापडले आहे. कारण त्या ठिकाणी खानापूर रोड हा मार्ग रिंग रोडसाठी वळतो क्रॉस होतो. येथे फ्लाय ओव्हर होणार असून झाड शहापूर गावाच्या सभोवती रिंग रोड होणार आहे. त्यामुळे या गावच्या संपूर्ण जमिनीचे भूसंपादन करण्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची योजना आहे. या संदर्भात माहिती हक्क अधिकाराखाली मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नकाशाची मागणी केली होती. तथापि त्यांनी तो देण्यास नकार दिला.

खरंतर माहिती हक्क अधिकाराखाली विचारणा केल्यास सरकारी कागदपत्र अथवा माहिती उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. त्यामुळे मी केलेली नकाशाची मागणी धुडकावून लावण्यामागे काय गुपित आहे? ते आम्हा शेतकऱ्यांना समजलं पाहिजे. तसेच सुपीक शेतजमिनींच्या अन्याय भूसंपादनाचा जो डाव प्राधिकरणाने रचला आहे. त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी एकजुटीने न्यायालयात लढा देणे आवश्यक आहे असे मत व्यक्त करून माहिती हक्क अधिकार डावलणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे नारायण सावंत यांनी स्पष्ट केले. बेळगाव शहराच्या रिंग रोडचे दुष्परिणाम म्हणजे संपूर्ण झाड शहापूर गाव तसेच तेथील सुपीक शेत जमीन नामशेष होणार आहे. त्याचप्रमाणे झाडशहापुर गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.Narayan sawant

नारायण सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करून झाडशापुर येथील कोणत्या भागातील जमीन जाणार आहे? याबाबतची माहिती आणि नकाशा मागितला होता. मात्र अनेकदा विचारणा करूनही महामार्ग प्राधिकरणाकडून माहिती देण्यास चालढकल केली जात आहे.

महामार्ग प्राधिकरण शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून, त्यांना अंधारात ठेवून भूसंपादन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी योग्य ती माहिती करून घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार झाड शहापूर येथे मोठा चौक निर्माण होणार असून त्यामुळे या भागातील शेती व घरे नामशेष होणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.