Monday, January 27, 2025

/

तज्ञ समिती बैठकीत कोणते महत्वाचे झाले निर्णय

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवणे, पंधरा दिवसांत उच्चाधिकार समितीची बैठक घेणे आणि सीमाभागातील जनतेला मोफत आरोग्य सेवेबाबत महत्वाचे निर्णय बुधवारी मुंबईत मंत्रालयात झालेल्या तज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तज्ञ समिती अध्यक्ष, खासदार धैर्यशील माने होते.

आसाम आणि मेघालयाच्या धर्तीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यात यावा, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार येत्या आठ दिवसांत महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याचे ठरले. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन त्यामध्ये न्यायालयीन कामकाजामधील अडथळे दूर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
सीमाभागात मराठी भाषिकांना आरोग्य सेवा देताना दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने होत आला आहे.

त्यामुळे सीमाभागातील 865 गावांतील मराठी जनतेला महाराष्ट्रात मोफत आरोग्य सेवा देण्याबाबत तज्ज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र घेऊन येणार्‍या प्रत्येक मराठी माणसावर महाराष्ट्रात उपचार करण्यात येतील, असेही ठरले. आरोग्याच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय असून या निर्णयाची तत्काळ दखल घेण्यात यावी, असा आदेश अध्यक्ष खासदार माने यांनी बजावला.Mes meeting

 belgaum

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लवकरच चंदगड येथे प्रांत दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. याबाबत याआधीही निर्णय झाला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही अध्यक्ष खासदार माने यांनी दिली.

तज्ज्ञ समितीला सीमाभागातील माहिती मिळवून देण्यासाठी आणि इतर माहितीसाठी आज म. ए. समिती नेते अ‍ॅड. एम. जी. पाटील आणि अ‍ॅड. महेश बिर्जे यांची तज्ज्ञ समिती सल्लागारपदी नियुक्तीचा निर्णयही घेण्यात आला. यावेळी तज्ज्ञ समितीच्या निमंत्रकांत आणखी काही नावे जोडण्यात येतील, अशीही ग्वाही खासदार माने यांनी दिली.

या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, दिनेश ओऊळकर, प्रकाश मरगाळे, अ‍ॅड. एम. जी. पाटील, अ‍ॅड. महेश बिर्जे, रमाकांत कोंडुसकर, अ‍ॅड. संतोष काकडे, विकास कलघटगी, कपिल भोसले, सागर पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.