बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेला प्रथमच भाषिक रंग वगळून आलेली बरखास्तीची टांगती तलवार कशी रोखली जाणार यावर जोरदार मनपा वर्तुळात दिवसभर जोरदार चर्चा रंगल्या होत्या.सरकारने बजावलेल्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी एकीकडे कायदा विभागाचा सल्ला घेतला जात असला तरी दुसरीकडे मुख्यमंत्री यांची भेट घेण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला आहे.
महापालिकेला आलेल्या कारणे दाखवा नोटीसी विरोधात सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर मंत्र्यांना भेटण्याचा निर्णय नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. करवाढ केली नसल्यामुळे नगरप्रशासन खात्याने महापौर शोभा सोमनाचे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून महापालिका सभागृह बरखास्त करण्याचा इशारा दिला आहे.
यासाठी एकदम जागे झालेल्या सत्ताधारी गटाने शुक्रवारी बैठक घेतली. त्याला विरोधी गटातील नगरसेवकांनाही सहभागी करून घेतले होते. नोटीशीला उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी यांच्या कक्षात सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत महापालिकेने 16 सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिका कार्यक्षेत्रात पाच टक्के करवाढ करण्याचा ठराव केला आहे. या ठरावाची माहिती सरकारला पाठवण्यात आली आहे. तरीही कारणी दाखवा नोटीस बजावून महापालिका सभागृह बरखास्तीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे 16 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या ठरावाची पत्र, सभेचे इतिवृत्त, व्हीडीओ चित्रण नगरप्रशासन खात्याला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत विरोधी गटातील नगरसेवकांचेही मत विचारण्यात आले. त्यावेळी अनेकांनी आपण तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. अखेर या कारवाई विरोधात सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, नगर प्रशासन मंत्री भैरती सुरेश आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेण्याचा निर्णय झाला.