बेळगाव लाईव्ह :ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं मंगळवारी कोल्हापूर येथे निधन झाले आणि एक महत्त्वाचा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता हरपला. राजाभाऊ एक तगडे लेखक होते, त्याचबरोबर जिद्दीचे समाजसेवक होते. समतावाद ,माणसाचं जगणं ह्या विषयी त्यांची निश्चित भूमिका होती. राजाभाऊ त्या दृष्टिकोनातून अनेक कार्यक्रमात भाग घेत असत. आणि त्यामुळे राजाभाऊ सीमावर्ती भागात परिचित असणारे व्यक्तिमत्व होतं. राजाभाऊंचा बेळगावचा घनिष्ठ संबंध होता. त्यांचा बेळगाव परिसरात मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात होता.
सीमाभागातील अनेक साहित्य संमेलन नियोजनात त्यांनी भाग घेतलेला होता, त्याचबरोबर बेळगाव परिसरातील अनेक साहित्य संमेलनात त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता .पुरोगामी साहित्य संघाच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे राजाभाऊ अध्यक्ष होते. त्यावेळी आपली भूमिका मांडताना राजाभाऊंनी माणसाच्या जगण्याच्या खूप महत्त्वाच्या महत्त्वाच्या नोंदी त्यावेळी नमूद केल्या होत्या. राजाभाऊ साधनाचे संपादक म्हणूनही काम करत असत, त्याचबरोबर अनेक होतकरू लेखकांचे ते मार्गदर्शक होते. राजाभाऊ उत्तम कवी होते, चांगले नाटककार होते त्याचबरोबर उत्तम प्रवासवर्णन लिहिणारे ही लेखक होते ,त्यामुळे राजाभाऊंच्या जाण्याने प्रकाशन व्यवसायाची हानी झालीच, त्याबरोबर सामाजिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे.
न पेटलेले दिवे ,त्याचबरोबर बिहारवर केलेले त्यांनी प्रवास वर्णन जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी घेतलेली अतिरेक्यांची मुलाखत आणि विविध ललित लेखनाची त्यांची मोठी लेखकीय कारकीर्द आहे. या प्रत्येक साहित्य प्रकारात त्यांनी केलेली मुशाफिरी ही लेखक म्हणून खूप थोर होती. त्याचबरोबर कवी म्हणूनही राजाभाऊ एक महत्त्वपूर्ण कवी होते.
त्यांचा कोल्हापुरात प्रसिद्ध झालेला कवितासंग्रह तज्ञ समीक्षकांच्या कडून नावाजला गेला .त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचे उदाहरण म्हणजे त्यांनी राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला त्यावेळी मंत्री हर्षवर्धन वर्धन पाटलांच्या देखत माईक हातात घेऊन शासनाचा निषेध केला. अशा पद्धतीने आपल्या भूमिकेशी ठाम असणारे राजाभाऊ हे आपल्या तत्त्वनिष्ठ पणासाठी प्रसिद्ध होते.
बिहारचे मुख्यमंत्री माननीय नितीश कुमार यांच्याशी त्यांचे अतिशय मित्रतापूर्ण संबंध होते, अनेकदा त्यांचे फोनवरून संवाद व्हायचे, त्यांनी लिहिलेल्या बिहार विषयीच्या पुस्तकाचं नितीश कुमार यांनी वाचन केलं, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच बिहार तुम्ही जसा आहे तसेच तसा मांडला आणि बिहारची खरी ओळख समाजापुढे मांडली असं त्यांचं कौतुक केलं.
पुढे बोलताना ते म्हणत होते की आजवर बिहार म्हणजे एक मागासलेलं राज्य, एक अतिरेकी राज्य अशा पद्धतीने लोकांनी केलेलं वर्णन याला तुम्ही छेद दिला, आणि खरा बिहार तुम्ही लोकांच्या पुढे मांडला त्याबद्दल बिहार तर्फे मी तुमचं आभार मानतो अशा पद्धतीचे त्यांचे कौतुक केले. नक्षलवादी चळवळीतील काही नक्षलिष्ठ तरुणांची त्यांनी वेळोवेळी मुलाखत घेतलेली होती आणि ,नक्षलवादी चळवळीच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा अभ्यास करणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्याचबरोबर गणेश देवी सारख्या भाषा तज्ञांनी राजाभाऊंच्या एकंदर कार्याचे कौतुक केलेलं होते. लेखकांच्या वर हल्ले झाले त्याविरुद्ध आवाज उठवण्यात राजाभाऊ नेहमीच अग्रस्थानी असायचे. धारवाड येथे झालेल्या आंदोलनात ते सहभागी झालेले होते. त्याचबरोबर विद्रोही साहित्य संमेलनातील त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असायचा. राजाभाऊ शिरगोटे यांच्या जाण्याने सामाजिक आणि साहित्य क्षेत्राची न भरून येणारी हानी झाली आहे.