बेळगाव लाईव्ह:राज्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी कारवाई करताना भ्रष्ट आणि उत्पन्नापेक्षा जास्त माया जमवलेल्या बेळगावसह राज्यातील 90 हून अधिक शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने व कार्यालयावर लोकायुक्त पोलिसांनी आज सोमवारी सकाळी एकाच वेळी छापे टाकून तपास सुरू केला आहे.
बेळगाव पंचायत राज खात्याचे सहाय्यक अभियंता एम. एस. बिरादार यांच्या विश्वेश्वरय्यानगर येथील श्रद्धा अपार्टमेंट तसेच कित्तूर आणि खानापूर येथील त्यांच्या निवासस्थानी बेकायदा मालमत्ता असल्याच्या तक्रारीवरून लोकायुक्त पोलिसांनी धाड टाकून तपास कार्य हाती घेतले आहे.
त्याचप्रमाणे गुलबर्गा येथील टाऊन प्लॅनिंग अधिकारी अप्पासाहेब कांबळे यांच्या निवासस्थानावर देखील छापा टाकण्यात आला आहे. त्यांच्या रामतीर्थनगर येथील निवासस्थानासह ऑटोनगर येथील कारखान्यावर धाड टाकून अधिकाऱ्यांनी तपास चालविला आहे. लोकायुक्त जिल्हा पोलीस प्रमुख हनुमंंय्या यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.
या पद्धतीने राज्यातील एकूण 90 शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकायुक्त पोलिसांनी छापेमारीची मोहीम उघडल्यामुळे संबंधित खात्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.