बेळगाव लाईव्ह:शेतकरी महिलांना शेतामधील विविध कामांसाठी दररोज ये -जा करावी लागते हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी रस्त्यावर वाटेत बसेस थांबविण्यात याव्यात अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी के. के. लमानी यांना दिला आहे.
वडगाव, शहापूर आदी भागातील शेतकरी आणि शेतकरी महिलांना विविध कामांसाठी दररोज शेतात जावे लागत असते. मात्र शेतकरी महिलांनी हात करूनही बस थांबविली जात नाही. त्यामुळे शेतकरी महिलांना त्रास व मनस्ताप सहन करावा लागतो.
यासंदर्भात कर्नाटक राज्य रयत संघाचे बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने परिवहन विभागाचे अधिकारी के. के. लमानी यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. यावेळी लमानी यांनी शेतकऱ्यांची मागणी मान्य करून शेतकरी महिलांना वाटेत बसमध्ये न घेतल्यास त्या बसचा क्रमांक द्यावा.
त्यानुसार संबंधित बस वाहकावर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तथापि सदर आश्वासनाची पूर्तता न झाल्यास शेतकरी व शेतकरी महिलांसह आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मरवे व उपस्थित अन्य शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
वडगाव, शहापूर भागातील शेतकरी महिलांना येळ्ळूर, धामणे रस्त्याने शेताकडे जाण्यासाठी बसने प्रवास करावा लागतो. पूर्वी महिलांना तिकीट होते, तेंव्हा वाटेत कुठेही बस थांबविली जात होती. मात्र आता महिलानां मोफत बस प्रवास झाल्याने बस चालक हात दाखवून विनंती करून देखील वाटेत बस थांबवत नाहीत.
वडगावपासून निघालेली बस थेट येळ्ळूर, धामणे येथेच जाऊन थांबते. त्यामुळे वाटेत आपल्या शेताजवळ उतरणाऱ्या शेतकरी महिलांची मोठी गैरसोय होते. बसमध्ये चढतानाच वाहक ‘थेट येळ्ळूर, धामणे येथे उतरायचे असेल तरच बसमधे या अन्यथा चढू नका’, अशी दमदाटी करत असतो.
परिणामी शेतकरी महिलांना पैशाचा भर्दंड सहन करत रिक्षा किंवा खासगी प्रवासी टेम्पोने शेताकडे ते-जा करावी लागते. त्यामुळे जर बस वाहक व चालक शेतकरी महिलानां अशी दुय्यम वागणूक देत असतील तर सरकारने महिलानां मोफत प्रवास दिलाच कशाला ? असा संतप्त सवाल केला जात आहे. यापूर्वी या रस्त्यावरील बस चालक, वाहक बेदरकारपणे वागत होते. त्याच्या विरोधात वडगाव रयत संघटनेतर्फे मुख्य अधिकारी लमाणी यांना भेटून येळ्ळूर रोडवर बळ्ळारी नाला, सिध्दिविनाय मंदीर, शहापूर, येळ्ळूर शिवार हद्द, पेट्रोल पंप या ठिकाणी बस थांबवावी अन्यथा तिथेच बस अडवून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवस बस सेवा सुरळीत सुरू होती.
मात्र आता पुन्हा बस चालक व वाहकांकडून शेतकरी महिलांकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुरुवारी संध्याकाळी तर शेतीचे काम आटपून घरी जाण्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या सुमारे 15-20 शेतकरी महिलांसाठी अंधार पडू लागला तरी एकाही बस चालकाने बस थांबविली नाही.
परिणामी त्या बिचार्या महिलांना जवळपास 5/6 कि.मी. चालत आपले घर गाठावे लागले. याची गांभीर्याने दखल घेत शेतकरी नेते राजू मरवे व अन्य शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे परिवहन अधिकारी के. के. लमानी यांची भेट घेतली. तसेच शेतकरी महिलांसाठी रस्त्यावर बस न थांबवल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.