बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील कोडेचवाड येथील संपतकुमार बडीगेर हा गेल्या 24 सप्टेंबरपासून बेपत्ता झालेला युवक तेलंगणा येथील अमीदाबाद जिल्ह्यातील एका गावात नंदगड पोलिसांच्या हाती लागला असून तो जिवंत असल्याने त्याच्या घरच्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
कोडचवाड (ता. खानापूर) येथील संपतकुमार बडीगर युवक हा बेपत्ता झाल्यानंतर त्याची दुचाकी, मोबाईल आणि बॅग मलप्रभा नदीपात्रातील येडोगा बंधार्यानजीक सापडले होते.
त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख व अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नदीपात्रात आठवडाभर शोधमोहीम राबवून देखील काहीच हाती लागले नव्हते. दरम्यान नदीपात्रात मिळालेला मोबाईल दुरुस्त करून त्यातील डाटाच्या मदतीने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानुसार नंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सत्तेगिरी आणि हवालदार शिवकुमार दूरदुंडीमठ हे पोलिसांचे पथक तपासासाठी तेलंगणाला रवाना झाले होते.
तेलंगणा येथे पोलीस तपास सुरू असताना गेल्या सोमवारी रात्री 11:30 च्या सुमारास तेथील अमीदाबाद जिल्ह्यातील एका गावातून संपतकुमारने आपल्या वडिलांशी संपर्क साधून आपण सुखरूप असल्याचे कळविले. घरच्यांनीही तात्काळ ज्यावरून फोन आला होता तो मोबाईल नंबर नंदगड पोलिसांना दिला.
तेंव्हा नंदगड पोलिसांनी तो नंबर तेलंगणा येथील तपास पथकाला देताच त्यांनी संपतकुमारला ताब्यात घेतले. दरम्यान आपल्या मुलाची आशा सोडलेल्या बडीगर कुटुंबीयांनी संपतकुमार जिवंत असल्याचे कळताच अत्यानंदाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.