बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत मराठीतून विषय पत्रिका द्यावी अशी मागणी मराठी नगरसेवकांनी केली होती त्या मागणीला काही प्रमाणात यश मिळाल्याचे चित्र आहे. कारण मनपाच्या शिक्याविनाका असेना मराठी भाषांतराची नोटीसीची प्रत मराठी नगरसेवकांना देण्यात आली आहे.
नगरसेवकांना कन्नड आणि इंग्रजीसोबत मराठी भाषांतरीत नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीशीवर महापालिकेचा शिक्का नाही. पण, म. ए. समिती नगरसेवकांनी मागणी केल्यामुळे महापालिकेने ही शक्कल लढवली आहे.त्यामुळे मराठीसाठी लढणाऱ्या नगरसेवकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
बेळगाव महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी 7 रोजी होणार आहे. या बैठकीत विषय पत्रिकेत पाच विषय आहेत. पण, बैठक प्रामुख्याने सफाई कामगारांची नियुक्ती, ठेकेदारांनी दिलेले आत्महत्येचे पत्र या विषयावरच रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवारी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेच्या विषय पत्रिकेत तिसर्या रेल्वे फाटकाजवळ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणे, बुडाच्या वसाहतींचे हस्तांतरण हे दोन प्रमुख विषय आहेत. पण, या विषयांपेक्षा 138 सफाई कामगारांची नियुक्ती आणि ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा विषयच वादाचा ठरणार आहे.
आरोग्य स्थायी समिती बैठकीत अध्यक्ष रवी धोत्रे यांनी वाय. बी. गोल्लर आणि एन. डी. पाटील या ठेकेदारांवर ठपका ठेवत त्यांना ब्लॅक लिस्ट करण्याचा आणि त्यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे सर्व नऊ ठेकेदारांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन देत 16 ऑक्टोबरपासून काम बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
याशिवाय वाय. बी. गोल्लर यांनी रवी धोत्रे व पर्यावरण अभियंते हणमंत कलादगी यांनी आपल्याला 138 सफाई कामगारांना वेतन देण्यासाठी दबाव घातला आहे. त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ बिघडले असून आपण आत्महत्या केल्यास किंवा जीवाचे बरेवाईट झाल्यास धोत्रे आणि कलादगी जबाबदार असतील, असा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे. त्यामुळे या विषयावर सभेत वाद होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष या विषयावर काय भुमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.