बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील एका सुकामेव्याच्या दुकानांमध्ये खरेदीच्या बहाण्याने येऊन गल्ल्यातील 50 हजार रुपयांचे बंडल लंपास केल्या प्रकरणी खडेबाजार पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात दोन महिलांसह एकुण चार इराणी नागरिकांना गजाआड केले आहे.
बहामन अब्दुलहुसेन बिनैझा (वय 36), हबीबी हसन मोघोल (वय 60), शैदा घोलम करीमझादी (वय 20) आणि करीम अहमद दवालू अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
इराण येथील हे सर्वजण प्रवासी व्हिसाद्वारे एका महिन्याच्या भारत पर्यटनासाठी आले आहेत. शहरातील देशपांडे गल्ली येथील शगुन ड्रायफ्रूट्स या दुकानात गेल्या शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खरेदीसाठी ऑटो रिक्षातून आलेल्या तिघा अज्ञातांनी दुकानाच्या गल्ल्यातील 50 हजार रुपयांचे बंडल पळविले होते.
याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर खडेबाजार उपविभागाचे एसीपी अरुणकुमार कोळूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने वेगाने तपासाची चक्रे फिरवून केवळ दोन दिवसात उपरोक्त इराणी चौकडीच्या मुसक्या आवळल्या.
सुकामेव्याच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि ऑटो रिक्षा चालकाने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चोरलेली रोख रक्कम, टोयोटा कोरोला कार आणि सात मोबाईल असा एकूण 14 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
खडेबाजार पोलीस ठाण्यामध्ये ताब्यात घेतलेल्या चौघांचीही काल रविवारी कसून चौकशी करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.