बेळगाव लाईव्ह: मल्लापूर, घटप्रभा, गोकाक येथे हनीट्रॅप करत असल्याच्या संशयावरून स्थानिक लोकांनी एका महिलेला मध्यरात्री घराबाहेर खेचून तिची गळ्यात चपलांचा हार घालून गावात धिंड काढल्याची घटना मल्लापुर -घटप्रभा (जि. बेळगाव) येथे घडली.
धिंड काढण्यात आलेल्या महिलेचे नाव श्रीदेवी असे असल्याचे समजते. मल्लापूर येथील मृत्युंजय सर्कल परिसरातील पीजी नगर मधील स्त्री-पुरुषांनी श्रीदेवीची मध्यरात्री गळ्यात चपलांचा हार घालून मारहाण करत रस्त्यावरून धिंड काढली.
सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्रीदेवी ही महिला तरुणांना हनीट्रॅप करून पैसे उकळत असल्याचा आरोप आहे. या कारणावरून पी. जी. नगर येथील स्त्री -पुरुष रहिवासी रात्री तिच्या घरी गेले. तसेच त्यांनी श्रीदेवीला जाब विचारून तिला शिवीगाळ करत जबरदस्तीने घराबाहेर काढले.
एवढे करून न थांबता जमलेल्या महिला व काही पुरुषांनी तिच्या गळ्यात चपलेचा हार घालून रस्त्यावर धिंड काढण्याद्वारे तिला पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
श्रीदेवी ही सध्या पोलिसांच्या ताब्यात असली तरी पोलिसांनी महिलेला अमानुष वागणूक देणाऱ्यांविरोधातही तक्रार दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.