Wednesday, November 20, 2024

/

अडचणीत सापडलेल्या खेळाडूची ‘यांनी’ केली स्वप्नपूर्ती

 belgaum

बेळगाव लाईव्ह:दक्षिण विभागीय कनिष्ठ राष्ट्रीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड होऊन देखील त्या स्पर्धेसाठीचा खर्च आवाक्या बाहेर असल्याने हताश झालेल्या कु. रिया कृष्णा पाटील या होतकरू क्रीडापटूला तत्परतेने मदतीचा हात देत आज शुक्रवारी सकाळी फ्रीमसन्स लॉज व्हिक्टोरिया क्रमांक 9 ने राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याच्या तिच्या स्वप्नाची पूर्तता केली.

याबाबतची माहिती अशी की, कर्ले येथील ज्योती हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या रिया कृष्णा पाटील पाटील हिची हनमगोंड, वारंगळ, तेलंगणा येथे 15 ते 17 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या 34 व्या दक्षिण विभागीय ज्युनिअर नॅशनल अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भालाफेक प्रकारात निवड झाली आहे.

मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आणि या स्पर्धेसाठी जाण्याकरिता येणारा खर्च मोठा असल्यामुळे रिया अडचणीत सापडली होती. जांबोटी रोडवरील योग्य सुविधा नसलेल्या बहादरवाडी या गावात खेळाचा सराव करणाऱ्या होतकरू रियाला आतापर्यंत तिचे शाळेचे शिक्षक, वर्गमित्र व गावातील लोकांचे सहकार्य लाभले आहे. तथापि तेलंगणा येथील स्पर्धेसाठी येणारा खर्च खूपच असल्यामुळे रिया पाटील हिने अडचणीत सापडलेल्या खेळाडूंच्या मदतीसाठी तत्पर असलेले सेवानिवृत्त शिक्षक वाय. पी. नाईक यांना काल गुरुवारी सकाळी फोन केला.

फोनवर आपल्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे आणि उद्या दुपारी 1 वाजता आपली रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशन वरून सुटणार असल्याचे तिने सांगितले.

तेंव्हा वाय. पी. नाईक यांनी लगेच त्यांचे मित्र फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांना फोन केला. दरेकर यांनी देखील त्वरेने रियाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी फ्रीमसन्स लॉज व्हिक्टोरिया क्र. 9 ने रिया पाटील हिला मदत करण्यासाठी आपला हात पुढे केला. फ्रीमसन्स लॉज व्हिक्टोरिया क्र. 9 च्या विनायक लोकरे यांनी आज सकाळी तातडीने आवश्यक निधीची व्यवस्था करून ती रियाकडे सुपूर्द केली आणि तिला सुयश चिंतले. मात्र तोपर्यंत सकाळचे 11:30 वाजले होते आणि ट्रेन सुटायला शेवटचा 1 तास बाकी होता.Sport's story

रियाला गावातून आणणे आणि तिकीट बुक करणे हे वाय. पी. नाईक आणि संतोष दरेकर यांच्यासमोर आव्हान होते. तथापि दरेकर यांनी आपल्या मित्राची गाडी मागवून तिच्यातून रिया पाटील तिचे पालक आणि प्रशिक्षकांना वेळेत रेल्वे स्टेशनवर पोहोचवले. तेंव्हा आवश्यक मदत करून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याच्या आपल्या स्वप्नाची पूर्तता केल्याबद्दल रिया पाटील हिने पाणावलेल्या डोळ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच संतोष दरेकर, वाय. पी. नाईक आणि फ्रीमेसन्स लॉज व्हिक्टोरिया क्र. 9 टीमचे मनापासून आभार मानले. यावेळी उद्योजक विनायक लोकूर यांच्या पाठिंब्याशिवाय रियाला केलेली मदत शक्य झाली नसती असे वाय.पी. नाईक आणि संतोष दरेकर यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.