बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील ज्या नागरिकांकडे वन्यजीव वस्तू असतील त्यांनी त्या येत्या दोन महिन्यात स्वेच्छा सरकार जमा कराव्यात, अशी कळकळीची विनंती वजा आवाहन कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी केले आहे.
लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस मधील स्पर्धक वर्थुर संतोष याला वन्यजीव वस्तू बाळगल्याने वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर लागलीच वनमंत्र्यांनी उपरोक्त आवाहन केले आहे.
बेळगावमध्ये देखील वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा मृणाल हा वाघ नखाचे पेंडंट वापरत असल्याच्या माहितीवरून त्यांच्या घराची नुकतीच झडती घेतली होती.
मंत्री हेब्बाळकर यांनी यासंदर्भात पत्रकारांसमोर खुलासा करताना मृणाल याने परिधान केलेले वाघ नखाचे पेंडंट हे प्लास्टिकचे असून त्याला त्याच्या लग्नात कोणीतरी ते भेटी दाखल दिले होते, असे स्पष्टीकरण दिले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री खांडरे यांनी वनसंरक्षण कायद्यासंदर्भातील जनजागृतीच्या अभावावर जोर दिला आहे.
एकंदर संतोष याच्या अटकेमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला असून त्या अनुषंगाने ज्यांच्याकडे वन्यजीव वस्तू आहेत त्यांनी त्या स्वच्छने सरकार जमा कराव्यात यासाठी राज्य सरकारने दोन महिन्याची मुदत दिली आहे. ही मुदत समाप्त होताच आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भात सरकारकडून परिपत्रक जारी केले जाणार आहे.
वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी गेल्या अनेक वर्षापासून वन्यजीव संरक्षण कायद्यातील उत्क्रांती (बदल) अधोरेखित केली आहे. दरम्यान 1972 मध्ये वन्यजीव वस्तू घोषित करून राखून ठेवण्याची संधी दिली जात होती. त्यानंतर 2003 आणि 2022 मध्ये या कायद्यात दुरुस्ती करण्यात येऊन तो अधिक कडक करण्यात आला. वन्यजीव संरक्षण कायद्यातील या सुधारणेनुसार वन्य प्राण्यांशी संबंधित वस्तू ताब्यात ठेवणे, अंगावर घालणे, वापरणे आणि त्या वस्तू जमा करणे हा शिक्षेस पात्र गुन्हा समजला जातो.