बेळगाव लाईव्ह:गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले सफाई कर्मचाऱ्यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. आमदार असिफ सेठ आणि मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या शिष्टाई नंतर कर्मचाऱ्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे.
थकीत वेतन अदा करावे, या मागणीसाठी 12 ऑक्टोंबर गुरुवारपासून रात्रंदिवस सुरू असलेले 138 सफाई कामगारांचे धरणे आंदोलन अखेर शुक्रवारी मागे घेण्यात आले. आमदार असिफ सेठ आणि आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी याप्रकरणी समजूत घातली असून लवकरच थकीत वेतन देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
थकीत वेतन देण्यात यावे, यासाठी सफाई कामगारांनी सदाशिवनगर येथील महापालिकेच्या गॅरेज समोर धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेवरही परिणाम झाला. अखेर आज सकाळी काही नगरसेवकांनी त्यावेळी आमदार असिफ सेठ आणि आयुक्त अशोक दुडगुंटी यांना बोलावून घेतले. यावेळी आमदार सेट आणि आयुक्त दुडगुंटी यांनी आंदोलनस्थळी जाऊन कामगारांची भेट घेतली.
कामगारांची नियुक्ती बेकायदेशीर पद्धतीने झाली आहे. पण, माणुसकीच्या आधारावर आम्ही तुमचे वेतन देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. सरकारला प्रस्ताव पाठवला आहे.
त्यामुळे आपण आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती आमदार सेट यांनी केली. त्यांच्या विनंतीला मान देत सफाई कामगारांनी आंदोलन मागे घेतले. लवकरात लवकर आमचे थकीत वेतन देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी महापालिका विरोधी गटनेता मुजम्मील डोणी, नगरसेवक शाहिदखान पठाण आदी उपस्थित होते. पोलिस सहाय्यक आयुक्त नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.