बेळगाव लाईव्ह :सध्या राज्यात डेंग्यूची साथ जोरात आहे यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार असून मधुमेह आणि डेंग्यू आजाराबाबत काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली.
बेळगाव येथील सुवर्ण विधान सौधा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव म्हणाले की, शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांना कामकाजाचा कालावधी संपल्यानंतर इतरत्र काम करता येते, त्यांनी आमच्या वेळेतच काटेकोरपणे काम करावे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की आमच्या सरकारकडे प्रचंड बहुमत असून जनतेला चांगले प्रशासन देत आहे. भाजपच्या शब्दाला किंमत नाही. आमचे सरकार राज्य समृद्ध करेल. आमचे सरकार पडेल असे भाजप वेड्यासारखे बोलत आहे. भाजपच्या आरोपात तथ्य नाही.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे खासगी रुग्णालय चालविणारे आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टर डॉ. जगदीश जिंगे हे सध्या बेळगाव जिल्ह्यात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, मात्र ते शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याची माहिती कानावर आली आहे. शासकीय वाहनाने गोकाक येथील खाजगी रुग्णालयात जात आहेत. याबद्दल चौकशी करण्यात येईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले
तत्पूर्वी सुवर्ण सौध मधील बैठकीत बेळगाव, धारवाड, हावेरी, गदग, विजापूर, बागलकोट, कारवार जिल्ह्यांतील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
मंत्री गुंडूराव यांनी आरोग्य खात्याच्या अधिकार्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. सरकारी योजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशा सूचना केल्या.
बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी, प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचार्यांची कमतरता असून ती दूर करण्याची विनंती केली. सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांनी, सौंदत्ती येथील रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य, सामुदायिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचे सांगितले.
आमदार राजू सेठ यांनी शहरातील जिल्हा रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा विकास व बळकटीकरण करण्यासाठी व अधिक कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
बैठकीला जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बेळगाव विभागाचे सहसंचालक मुलीमनी यांनी स्वागत केले.जिल्हाआरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी आभार मानले. यावेळी चिकोडीचे आमदार गणेश हुक्केरी, राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.