बेळगाव लाईव्ह: बेळगावचा महिला हॉकी संघ म्हैसूर येथे येत्या 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या म्हैसूर दसरा सीएम ट्रॉफी हॉकी स्पर्धेत सहभागी होत असून या संघाला शुभेच्छांसह निरोप देण्याचा समारंभ आज शुक्रवारी सकाळी उत्साहात पार पडला.
टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर आज सकाळी बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित महिला हॉकी संघाच्या निरोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी नितेश पाटील उपस्थित होते .त्याचप्रमाणे व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून बेळगाव जिल्हा युवजन अधिकारी श्रीनिवास, क्रीडाप्रेमी डॉ अनिल पाटील आणि माजी आमदार अनिल बेनके यांच्या पत्नी मीना बेनके उपस्थित होत्या. प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित मान्यवरांचे हॉकी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी आपल्या शुभेच्छापर भाषणात जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांनी सर्वप्रथम राज्यस्तरीय म्हैसूर दसरा हॉकी स्पर्धेत भाग घेत असल्याबद्दल बेळगावच्या महिला हॉकी संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले. निकाल काहीही लागू देत त्याचा विचार न करता प्रत्येक खेळाडूने आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याद्वारे बेळगावचा नावलौकिक वाढवावा. बेळगावला हॉकीची महान परंपरा आहे. बऱ्याच जणांना माहित नाही बंडू पाटील हे बेळगावचे पहिले ऑलंपियन होते. बेळगावातील एस्ट्रो टर्फ हॉकी मैदानासाठी यापूर्वीच प्रस्ताव मंजूर झाला आहे
. हे मैदान रामतीर्थनगर येथे उभारण्यात येणार आहे. सरकारने या मैदानाला कै. बंडू पाटील यांचे नांव सुचवले आहे. एस्ट्रो टर्फ मैदानासाठी खेलो इंडियाकडे सुद्धा प्रस्ताव धाडण्यात आला आहे. क्रीडा खात्याकडून आम्ही त्याच्या उत्तराची वाट पाहत आहोत. एकंदर लवकरच बेळगावात एक सुसज्ज हॉकी मैदान उपलब्ध होणार असून ज्यामुळे बेळगाव मधून अधिकाधिक दर्जेदार हॉकीपटू निर्माण होण्यास मदत मिळणार आहे असे सांगून जिल्ह्याच्या क्रीडा खात्याकडून हॉकी गोलरक्षकासाठीचे किट देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रसंगी म्हैसूरला रवाना होणाऱ्या बेळगावच्या महिला हॉकी संघातील खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांसह जिल्हा हॉकी संघटनेचे सेक्रेटरी सुधाकर चाळके, उपाध्यक्ष पूजा जाधव, विनोद पाटील, क्रेडाईच्या सदस्या दीपा भंडारी, आशा होसमनी आदींसह हॉकी संघटनेचे अन्य पदाधिकारी, सदस्य, पालक हितचिंतक आणि क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
म्हैसूर येथे येत्या सोमवारी 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या म्हैसूर दसरा सीएम ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भाग घेण्यासाठी बेळगावचा महिला हॉकी संघ उद्या शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी म्हैसूरला रवाना होणार आहे.