बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना करा आणि शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष जेष्ठ समिती नेते रणजित चव्हाण पाटील यांची शहर समितीच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करा अशी मागणी वाढू लागली आहे.
चार दिवसांपूर्वी झालेल्या शहर समितीच्या बैठकीत देखील हीच मागणी कार्यकर्त्यांनी केली.
बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विद्यमान अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारणी बदलण्यात यावी अशी जोरदार मागणी नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे.
शहर समितीच्या बैठकीस उपस्थित कार्यकर्त्यांपैकी बहुतांश सर्वांनी विधान सभा निवडणुकीच्या पराभवाच्या पाश्र्वभूमीवर कार्यकारिणीत बदल करा आणि रणजित चव्हाण पाटील यांना कार्याध्यक्ष करा अशी मागणी माजी उपमहापौर संजय शिंदे, राजू बिर्जे आदींनी केली या सूचनेला उपस्थितांपैकी बहुतांश जणांनी अनुमोदन देखील दिले. त्याचप्रमाणे जर रणजीत चव्हाण -पाटील यांना अध्यक्ष म्हणून नेमायचे नसेल तर किमान शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली जावी असेही संजय शिंदे, राजू बिर्जे आदींनी सुचविले.
त्यालाही बैठकीला उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले असे असताना शहर समितीच्या नेतृत्वाने पुन्हा एका बैठक शहर समिती पुनर्रचना करीता आयोजन करूया असे आश्वासन दिले होते त्यानुसार शहर समितीची पुनर्रचना करण्याची मागणी वाढू लागली आहे.
समितीचे जेष्ठ कार्यकर्ते मदन बामणे नेहमीच शहर समिती पुनर्रचना बाबत आग्रही असतात प्रत्येक बैठकीत ते हा मुद्दा उपस्थित करत असतात मात्र वरिष्ठांनी हा निर्णय घेऊन आगामी काळात चळवळ लढा बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून शहर समितीची पुनर्रचना आणि रणजित चव्हाण पाटील यांची शहर समिती कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.